मुंबईत मोठ्या प्रकल्पांच्या ऑर्डरमुळे Infra Stock मध्ये ७% दणदणीत तेजी; एप्रिलमध्ये ऑर्डरबुक ६००० कोटींवर
ET Marathi April 24, 2026 12:45 PM
मुंबईच्या रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांमध्ये दबदबा असलेल्या जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सला गुरूवारी २३ एप्रिल रोजी मुंबईतून तब्बल २,४८७.६५ कोटी रुपयांचे दोन मोठे प्रकल्प मिळाले आहेत. कंपनीने त्याची अधिकृत माहिती दिल्यानंतर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कंपनीच्या शेअरने ६.८३% ची मोठी झेप घेतली.

काय आहेत नवीन प्रोजेक्ट्स?कंपनीला मिळालेले दोन्ही प्रकल्प मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत:

१. मुंबई मेट्रो (MMRCL): महालक्ष्मी रेसकोर्स भागात सायन्स सेंटर मेट्रो स्टेशन आणि वरळी प्रोमेनेड यांना जोडणाऱ्या अंडरग्राउंड पादचारी मार्गाचे (Pedestrian Vestibule) बांधकाम कंपनी करणार आहे. याची किंमत ५२१.७७ कोटी रुपये आहे.

२. MCGM प्रकल्प: मुंबई महानगरपालिकेकडून (MCGM) मिळालेल्या १,९६५.८८ कोटींच्या कामामध्ये मालाड-मार्वे रोडचे रुंदीकरण, उड्डाणपूल आणि लागून रोड ते इन्फिनिटी मॉल दरम्यान पुलाचे बांधकाम समाविष्ट आहे. यात जे. कुमारचा वाटा ७३% (१,४३५.०९ कोटी) इतका आहे.


एप्रिल महिन्यातील 'हॅट्ट्रिक':केवळ हेच दोन प्रकल्प नव्हे, तर एप्रिल २०२६ मध्ये कंपनीने एकूण तीन मोठे प्रकल्प मिळवले आहेत:
१ एप्रिल: NHAI कडून वाधवन पोर्ट कनेक्टिव्हिटीसाठी २,३६० कोटींची ऑर्डर.
४ एप्रिल: लखनऊमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी १,१८४ कोटींचे काम.
२३ एप्रिल: मुंबईतील २,४८७.६५ कोटींचे दोन प्रकल्प.
या तिन्ही ऑर्डर्सची एकत्रित बेरीज ६,०३१.६५ कोटी रुपये इतकी होते. यामुळे कंपनीची आगामी काळातील महसुली स्थिती अत्यंत भक्कम दिसत आहे.

शेअर्सची कामगिरी कशी राहिली? जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सची मजबूत ऑर्डरबुक ही कंपनीच्या भविष्यातील नफ्याचे संकेत देत असून ६,००० कोटींपेक्षा जास्त कामाची खात्री मिळाल्याने कंपनीचा ईपीएस (EPS) वाढण्याची शक्यता आहे. या शेअर्समध्ये शुक्रवारीही मोठी हालचाल दिसू शकते, त्यामुळे मध्यम ते दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी या शेअरवर बारकाईने लक्ष ठेवणे फायद्याचे ठरू शकते. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बाजार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

कंपनीच्या प्रवर्तकांची भागिदारी J.Kumar Infraprojects Limited ही भारतातील एक आघाडीची पायाभूत सुविधा विकास कंपनी आहे. प्रामुख्याने मेट्रो रेल्वे, उड्डाणपूल, रस्ते, पूल आणि धरणे बांधण्यात या कंपनीचा हातखंडा आहे. मुंबई मेट्रोच्या अनेक लाईनच्या कामात या कंपनीचा मोठा सहभाग आहे.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.