पनीरच्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूक आता थांबणार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचा मोठा निर्णय 
एबीपी माझा वेब टीम April 24, 2026 09:13 PM

मुंबई: हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि बनावट 'चीज ॲनालॉग' खपवून ग्राहकांची होणारी फसवणूक आता थांबणार आहे. पदार्थात नैसर्गिक पनीरऐवजी 'चीज ॲनालॉग' वापरल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात 27 एप्रिल 2026 पासून ही मोहीम राबवली जात आहे.
 
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या या मोहिमेची दखल केंद्र सरकारच्या FSSAI (अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण) ने घेतली आहे. 21 एप्रिल 2026 रोजी तसे परिपत्रक काढून हा नियम देशभर लागू केला आहे. त्यामुळे शुद्ध पनीरसाठी महाराष्ट्राने दाखवलेली दिशा आता संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

विधानसभा सभागृहातही लोकप्रतिनिधींनी मुद्दा केला होता उपस्थित

विधानसभा सभागृहात लोकप्रतिनिधींनी पनीरच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला होता. वनस्पतीजन्य तेलापासून बनवलेले हे 'ॲनालॉग' पनीरसारखेच दिसत असल्याने ग्राहक फसवले जात होते. या तक्रारींची गंभीर दखल घेत मंत्री झिरवाळ यांनी तात्काळ हे पारदर्शकतेचे आदेश लागू केले आहेत. राज्याच्या या निर्णयाला केंद्र सरकारच्या FSSAI कडूनही पाठिंबा मिळाला असून तसे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

काय आहे नवा नियम?

​अन्न व औषध प्रशासन विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटला पारदर्शकता पाळावी लागणार आहे. जर एखाद्या पदार्थात दुधापासून बनवलेल्या नैसर्गिक पनीरऐवजी वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेले 'ॲनालॉग' वापरले असेल, तर त्याची माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. 1 मे 2026 पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाईल. जे हॉटेल चालक माहिती लपवतील, त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो.

मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे की,नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ग्राहकांना आपण नक्की काय खातोय हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पनीरच्या नावाखाली भेसळ करणाऱ्यांचे धाबे आता दणाणणार आहेत."

प्रशासनाचे निर्देश:

चीज ॲनालॉगच्या पुरवठादारांना विक्री बिलावर त्याचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल.
हॉटेल संघटनांशी चर्चा करून सर्व विभागीय अन्न आयुक्तांना याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
 रेस्टॉरंट आणि केटरर्सना बल्क मेसेजद्वारे या नव्या नियमांची माहिती दिली जात आहे.
या निर्णयामुळे हॉटेलमधील 'शाही पनीर' खरोखरच शुद्ध मिळणार असून, भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पनीर आणि चीज ॲनालॉगमधील फरक

अन्न सुरक्षा मानके विनियम 2011 नुसार पनीर हा केवळ दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे. तर डेअरी ॲनालॉगच्या हा दूधाव्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून तयार केला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला, तरी पनीर नसून 'चीज ॲनालॉग'या प्रवर्गात मोडतो. हॉटेल्स, उपाहारगृहे आणि जलद खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री करताना बिलावर, इलेक्ट्रॉनिक दर्शक फलकावर आणि मेन्यूकार्डवर स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उत्पादन घेताना लेबल काळजीपूर्वक वाचावे. त्यावर '' असा उल्लेख आहे का, हे तपासावे.

तक्रार कुठे कराल ?

ग्राहकांची दिशाभूल झाल्यास प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.