कुठं अवकाळी, कुठं वादळी वारा, तरीही पुढील 3-4 दिवस उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून नागरिकांना सूचना
सोमेश कोलगे April 24, 2026 09:13 PM

मुंबई : राज्यात विदर्भासह मराठवाड्यातही उष्णतेचा (Summer) कहर पाहायला मिळत असून अकोला, वाशिम जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सियसचा टप्पा पार केला आहे. मात्र, दुसरीकडे अवकाळीमुळे (Rain) काही ठिकाणी वातावरणात बदल झाल्याचं चित्र आहे. तरीही, भारत हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3-4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट तीव्र राहणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. गेल्या 24 तासांत देशातील अनेक भागांप्रमाणेच महाराष्ट्रातही उष्णतेची (Heatstroke) तीव्रता कायम राहिली. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तापमान 40 अंशांच्या वर पोहोचल्याचं पाहायला मिळालं.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 आणि 25 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भात 28 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तसेच, कोकण आणि गोव्यात 24 एप्रिल रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांचा वेग 30 ते 50 किमी प्रतितास राहू शकतो, त्यामुळे शेती व झाडांना काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा प्रभाव कायम

महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उकाडा अधिक जाणवेल, असा अंदाज केंद्रीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

शेतकऱ्यांसाठी सूचना

हवामान विभागाने शेतकऱ्यांनाही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, पिकांना सकाळी किंवा संध्याकाळी हलके पाणी द्यावे, जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंगचा वापर करावा. नव्या लागवडीवर सावलीसाठी जाळी (shade net) वापरावे, असे सूचवण्यात आले आहे.  

नागरिकांसाठी सूचना

नागरिकांनी शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्यावेत, हलके, सैल कपडे वापरावेत, असे हवमान विभागाने म्हटलं आहे. तसेच, हवामान विभागाने उष्णतेबरोबरच वादळी पावसाच्या शक्यतेमुळेही नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.