दिलासादायक! अखेर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात, नदीकाठच्या गावांची तहान भागणार 
सुनील दिवाण, एबीपी माझा April 25, 2026 01:13 AM

Ujani Dam :  शेतकऱ्यांसाठी  एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून आलेगाव येथे  कोरड्या पडलेल्या भीमा नदीपात्रात सुरू असलेले आंदोलन आज संपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पॉवर हाऊस साठी 1600 आणि भीमा नदीत 1400 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

गेले नऊ दिवसापासून भीमा नदीपात्रात सुरु होतं आंदोलन 

आलेगाव येथे गेले नऊ दिवसापासून कोरड्या पडलेल्या भीमा नदीपात्रात सुरू असलेले आंदोलन आज संपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पॉवर हाऊस साठी सोळाशे आणि भीमा नदीत चौदाशे क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. काल रात्री पालक मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानंतर हे पाणी सोडण्यात येणार होते. मात्र आलेगाव येथे गेले नऊ दिवसापासून भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या आंदोलनामुळे काल हे पाणी सोडता आले नव्हते. आज अखेर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत घातल्यानंतर कमी प्रमाणात पाणी सोडण्याची मागणी मान्य केली आहे. 

प्रशासनाने सहा हजार क्युसेक ऐवजी 3000 क्युसेक विसर्गाने पाणी सोडले

आज भीमा नदी मध्ये उजनी धरणातून एकूण सहा हजार क्युसेक निसर्गाने पाणी सोडण्यात येणार होते ते कमी करून आता 3000 क्युसेक विसर्गने पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. आमच्या भागात जास्त क्षमतेने पाणी सोडल्यास थांबणार नाही अशी मागणी या ग्रामस्थांची असल्याने अखेर प्रशासनाने सहा हजार क्युसेक ऐवजी 3000 क्युसेक विसर्गाने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. हळूहळू आता पाण्याचा विसर्ग येत्या काही दिवसात वाढवण्यात येणार आहे. 

 
सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी पात्र कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. परिणामी पिके सुकू लागल्याने उजनी धरणातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी पाणी सोडावं या मागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे ती जळून जाण्याची भीती व्यक्त होत होती. याशिवाय जनावरांसाठी लागणारे पाणी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळं नागरिक देखील आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भीमा नदीत पाण्या सोडण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. आज अखेर भीमा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे. 
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.