Velhe Fire : भीषण आगीत चार सख्ख्या भावांची घरे भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली
esakal April 25, 2026 02:45 AM

वेल्हे, (पुणे) - धानेप येथील धनगरवस्ती (ता. राजगड) येथे भीषण आगीत चार सख्ख्या भावांची घरे भस्मसात झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (ता. 24) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून सुदैवाने जीवितहानी टळली.

तोरणा खोऱ्यातील धानेप येथील धनगरवस्ती येथे लागलेल्या भिषण आगीत विठ्ठल महादू डोईफोडे, शिवाजी महादू डोईफोडे, सुरेश महादू डोईफोडे, लक्ष्मण महादू डोईफोडे, या चार सख्ख्या भावांची घरे जळून भस्मसात झाली.

घरातील लाईटच्या मीटरला शॉर्टसर्किट झाल्याने तसेच घरामध्ये जनावरांचा चारा भरला असल्याने आगीचा भडका उडून घराला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यावेळी घरात विठ्ठल डोईफोडे यांच्या आई घरात होत्या. घरात आगीने पेट घेतल्याचे दिसताच त्या बाहेर आल्या. मात्र यावेळी जवळपास कोणीही नव्हते त्यात घरातील दागिने, रोख रक्कम, अन्नधान्य, कपडे, संसार उपयोगी साहित्य, असे मिळून लाखोंचे नुकसान झाल्याचे विठ्ठल डोईफोडे यांनी सांगितले.

धानेपचे पोलिस पाटील अश्विनी मळेकर व स्थानिक सरपंच राहुल मळेकर यांनी घटनेची माहिती महसूल व पंचायत विभागाला दिली.त्यानंतर तहसीलदार निवास ढाणे यांच्या सूचनेनुसार धानेपचे तलाठी आत्माराम हापसे यांनी दोन किलोमीटर अंतरावर पायपीट करत जात घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा केला.

या बाबत राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे म्हणाले, घराला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पंचनामा झाला आहे याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.