हौस ऑफ बांबू : चलो, रबात...टबात नव्हे!
esakal April 25, 2026 09:45 AM

नअस्कार! मी अगदीच पुस्तकातली किडी आहे, हे अनेकांना ठाऊक आहे. एकदा पुस्तकात डोकं घातलं की मी सगळं विसरत्ये. वेळकाळाचं भान राहात नाही. मध्यंतरी अशीच पुस्तक वाचून उठल्ये आणि घरच्यांना विचारलं की, ‘मी जेवले का आज?’

‘नाही!’ असं उत्तर आलं. मला अचानक सडकून भूक लागली. काय खावं? तेवढ्यात ‘आंघोळही राहिली आहे, निदान तेवढं तरी करा,’ असं सांगण्यात आलं. मला आश्चर्यच वाटलं. टॉवेल ओढून न्हाणीघराकडे निघावं, तेवढ्यात एक पुस्तक दिसलं. सहज उभ्या उभ्या चाळायला लागले. ती अजून उभीच आहे. जेवणही राहिलं, नि आंघोळीला पाणी...जाऊ दे मेलं.

परवाच जागतिक पुस्तक दिन पार पडला, त्या दिवशी मात्र सुस्नात होऊन बाहेर पडल्ये. पुस्तक दिनाचे इतके इव्हेंट झाले की विचारू नका. ‘हॅप्पी बुकडे’चे मेसेज तर सकाळपासून येत होते. गुलजारसाहेबांची ‘किताबें झाँकती है...’ कविता मोजून एकशेएकोणपन्नास लोकांना पाठवली.

किताबें झांकती हैं बंद अलमारी के शीशों सेबड़ी हसरत से तकती हैंमहीनों अब मुलाक़ातें नहीं होतींजो शामें उन की सोहबत में कटा करती थीं, अब अक्सरगुज़र जाती हैं कम्पयूटर के पर्दों परबड़ी बेचैन रहती हैं किताबें...

...बुक डे ला हे मस्ट असतं. बुक डेचे इव्हेंट जास्त आणि पुस्तकं कमी (वाचन त्याहूनही कमी!) अशी स्थिती झाली आहे. त्यात सगळ्यांनी यंदाच्या वर्षी रबातला जावं, असं युनेस्कोनं आवाहन केलंय. रबात ही मोरोक्कोची राजधानी आहे. पण ती जागतिक ग्रंथ राजधानी आहे, हे नुकतंच कळलं. रबातमध्ये वाचन संस्कृती प्रचंड आहे म्हणे. तिथं तिठ्या तिठ्यावर पुस्तकांची दुकानं आहेत. आपल्याकडे पान टपऱ्या असतात तशा. याही तशा पानाच्या टपऱ्याच, पण पुस्तकांच्या पानाच्या.

आता सगळं सोडून रबातला कोण उठून जाणार? तिथं जायचं कसं? कोण नेणार? तिथं संमेलनं वगैरे होतात का? त्याला (फुकट) निमंत्रित पाहुणे वगैरे बोलावतात का? असे एक ना हजार प्रश्न माझ्या मनात पुस्तकांच्या पानांसारखे फडफडू लागले.

युनेस्कोच्या दाव्यानुसार रबातमध्ये ५४ मोठ्या प्रकाशन संस्था आहेत आणि शेकडो ग्रंथविक्री करणारी दुकानं आहेत. आफ्रिकेतलं सर्वांत मोठा बुक फेस्टिवल रबातमध्ये होतो. रबातमध्ये मधुचंद्राला जाऊन आपापली पुस्तकं टबात बसून वाचून काढणारी अनेक जोडपी आढळतात म्हणे. (कमालच आहे नै?)

यातली चौथी अट सोडली तर मी म्हणत्ये, आमचं पुणं काय वाईट आहे?

पुण्यातसुद्धा गेल्या वर्षी दणक्यात पुणे बुक फेस्टिवल झाला. इथल्या पेठांमध्ये फेरफटका मारला तर डझनावारी प्रकाशन संस्था सापडतील. टिळक रोडवर चालताना तुमचा चौघांना धक्का लागला, तर त्यातले दोन प्रकाशक निघतात. सकाळच्या प्रहरी इथल्या वाडेश्वर, रुपाली, वैशाली, किमया, अमाया या सांस्कृतिक अड्ड्यांवर कित्येक वाचनवेडे इडल्या खाताना आढळतील. एक तर ते पुणेकर असल्यामुळे त्यांना जगाचं बरंचसं ज्ञान ऑलरेडी असतं. रबातऐवजी पुणं काय वाईट आहे?

रबात ही जागतिक ग्रंथ राजधानी म्हणून युनेस्कोनं घोषित केली असली तरी खरीखुरी सांस्कृतिक ग्रंथ राजधानी पुणे हीच आहे. (नागपूर, विलेपार्ले, डोम्बिवली, नाशिक, संभाजी नगर, मालगुंड, सातारा, कोल्हापूर यासुद्धा सांस्कृतिक राजधान्याच आहेत. वेळप्रसंग पाहून त्यांचा उल्लेख पुढेमागे करीन.)

मी युनेस्कोला पत्र पाठवून पुण्याचं महत्त्व पटवून देणार आहे. पटलं तर आनंदच आहे. पण त्याआधी युनेस्कोला पत्र कुठं टाकायचं, हे मला कुणी सांगेल का?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.