भुसावळ, ता. २४ : येथील नगराध्यक्षा गायत्री भंगाळे (गौर) यांचा अनुसूचित जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. परिणामी भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुसावळ पालिकेची सार्वत्रिक निवडणूक गेल्या वर्षी झाली. त्यात लोकनियुक्त नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव होते. यासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात होते.
भाजपच्या उमेदवार व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांनी एक हजार ८४७ मतांनी निसटता पराभव केला होता. त्यानंतर गायत्री भंगाळे (गौर) यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हातात घेऊन कामकाज सुरू केले होते.
अटकेच्या दिवशीच खरातची जमीन खरेदी, पत्नी फरार असताना तिच्या नावे व्यवहार पूर्ण; महसूल विभागाच्या कारभारवर प्रश्नचिन्हगायत्री भंगाळे यांनी निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे अर्ज केला होता. त्याच दिवशी त्यांना जातप्रमाणपत्र मिळाले होते. वास्तविक त्या महाराष्ट्रात स्थलांतरित होत्या व त्यांच्या नातेवाइकांची कुर्मी, तर काहींची चर्मकार जात आहे. भंगाळे यांनी सादर केलेला जातीचा दाखला बनावट असून, त्यांच्या नातेवाइकांचा मूळ रहिवास उत्तर प्रदेशातील महुबा जिल्ह्यातील असल्याची तक्रार रजनी सावकारे, संजय तायडे, राहुल तायडे आणि प्रमोद सावकारे यांनी जळगाव येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत समितीने पुराव्यांची तपासणी केली. गुरुवारी (ता. २३) हा दाखला अवैध असल्याचा निकाल दिला.
भंगाळेच नव्हे, तर हा दाखला देणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांवरही समितीने ठपका ठेवला आहे. 'प्रांताधिकाऱ्यांनी कोणत्याही पुराव्यांची सखोल चौकशी न करता हा दाखला दिला', असे निरीक्षण नोंदवून समितीने संबंधित अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या कायदेशीर पेचामुळे भुसावळच्या राजकीय गोटात चिंतेचे वातावरण असून, आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची चिन्हे आहेत. जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय जिल्हा जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा नयना बोंदार्ड, सचिव एन. एस. रायते, सदस्य आर. आर. महाजन यांच्या समितीने दिला आहे. रजनी सावकारे व इतर तक्रारदारांतर्फे अॅड. वसंत भोलाणकर यांनी, तर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे (गौर) यांच्यातर्फे अॅड. आनंदसिंग बयास यांनी काम पाहिले.