महामुंबईला चटके तर नागपूर पुन्हा 'हॉट', विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; अकोला, महाडमध्ये पारा ४५ अंशावर
esakal April 26, 2026 03:45 PM

देश व जगातील परिस्थितीमध्ये तणाव वाढत असताना उन्हाची तीव्रताही कायम आहे. देशात सर्वत्रच कमाल तापमानाचा पारा वाढू लागला असून, अनेक भागामध्ये कमाल तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. देशभरात सर्वत्र उष्णतेची लाट आहे. अकोला येथे पुन्हा एकदा ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर राजस्थानातील श्रीगंगानगर येथे ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. वायव्य, मध्य आणि उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविण्यात आले. Nagpur and Vidarbha face intense heat wave Akola records 45 degree temperature

राज्याची राजधानीही तापली

मुंबईत उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, शनिवारी मुंबईसह महानगर प्रदेश क्षेत्रात तापमानाने उच्चांक गाठला आहे. या क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील बिरवाडी येथे सर्वाधिक ४५.१ अंश, तर ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमध्ये सर्वाधिक ४३.८ तापमानाची नोंद झाली. ठाणे शहरातही तापमान चाळिशीपार गेले असून मुंबईत विक्रोळी ३९.३ अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात उष्ण ठिकाण ठरले. दरम्यान, राज्यभरात उष्णतेची लाट पसरली असून विदर्भातील अमरावती, अकोला येथे सर्वाधिक ४५.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानाबरोबरच आर्द्रता वाढत असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

दोन ट्रकच्या मधे कारचा चुराडा, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल, मृतदेह ओळखणंही कठीण

मुंबई उपनगरांतील अनेक भागांत पारा ३५ अंशांच्या वर गेल्याने मुंबईकर उकाड्याने प्रचंड घामाघूम झाले. विक्रोळीपाठोपाठ राम मंदिर परिसरात ३८.५ अंश, वांद्रे येथे ३७.२ अंश आणि विद्याविहारमध्ये ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच दहिसरमध्ये ३५.२ अंश आणि चेंबूर (टाटा पॉवर) येथे ३५.० अंश सेल्सिअस इतका पारा राहिल्याने उपनगरात उन्हाचा चटका तीव्रतेने जाणवत आहे.

उपराजधानी पुन्हा 'हॉट', तीन दिवस उष्णतेची लाट

ढगाळ वातावरणाने दिलेला आंशिक दिलासा आता पूर्णपणे ओसरला असून, विदर्भावर पुन्हा उन्हाच्या झळांचा मारा सुरू झाला आहे. नागपुरात तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पार गेला आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिक पुन्हा एकदा भीषण उकाड्याने हैराण झाले आहेत.

विदर्भ तापला

विदर्भात गेल्या २४ तासांत तापमानात वेगाने वाढ झाली आहे. उपराजधानी नागपूरचा विचार करता, शुक्रवारी (ता. २४) ४३.२ अंशांवर असलेला पारा शनिवारी ४४.२ अंशांवर पोहोचला. मागील आठवड्यात १९ एप्रिलला तापमानाने ४४.४ अंशांपर्यंत झेप घेतली होती. एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात २०१६, २०१७, २०१८ आणि २०२२ मध्ये शहराचे तापमान ४५ अंशांच्या पुढे नोंदवले गेले होते. यंदा मे महिना सुरू होण्यापूर्वीच तापमानाने ही पातळी गाठल्याने, आगामी दिवसांत उष्णतेचे सर्व जुने विक्रम मोडीत निघण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान विभागाने उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्याचे वातावरण उष्णतेसाठी पोषक असल्याने पारा आणखी भडकण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हापासून संरक्षणासाठी योग्य खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

पुण्याचे तापमान 40 अंशांच्या पुढे

रात्रीच्या तापमानात वाढ झाली असली तरी पुढील दोन दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरात कालपासून पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊन ते 40.9 अंशावर पोहोचले लोहगाव परिसरात 42° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली रात्रीच्या तापमानातील सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.