Vidhan Parishad Election 2026 Abhijeet Bichukale: विधान परिषदेचे पडघम वाजले आहेत. विधान परिषदेसाठी लॉबिंग, मोर्चेबांधणी जोमात सुरू झाली आहे. विरोधी गटापेक्षा सत्ताधाऱ्यांमध्ये कुणाची वर्णी लागेल याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. भाजप, शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून आहेत. ज्यांना यापूर्वीच्या निवडणुकीत आश्वासन देण्यात आले त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. विविध माध्यमातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी सूत्रंही कामाला लावली आहेत. पण या सर्व राजकीय घडामोडीत एका दाव्याने मोठा कहर घातला आहे. अभिजीत बिचुकले यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या ऐवजी बिचुकले यांना वरिष्ठ सभागृहाची आमदारकी द्यावी अशी मागणी रेटण्यात आली आहे.
नीलम गोऱ्हे यांना नको बिचुकले यांना द्या संधी
नीलम गोऱ्हे यांच्या जागी बिचुकले यांना संधी द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे थेट पत्रच पाठवले आहे. विधान परिषदेवर नीलम गोऱ्हे यांच्या जागी अभिजीत बिचुकले यांना संधी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे. त्यांच्या या मागणीने एकच खळबळ उडाली आहे. बिचुकले यांनी अशी काही मागणी केलेली नाही. तर त्यांच्यासाठी तृप्ती देसाई यांनी ही मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीने राजकीय गोटात चर्चेचे पेव फुटले आहेत.
तृप्ती देसाईंनी का केली ही मागणी?
तृप्ती देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यात, “सध्या विधान परिषदेवर आपल्या पक्षाकडून पुन्हा एकदा डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नीलमताई अनेक वर्षे विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्यांनी पक्ष व संघटना वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. अनेक महिलांना नेतृत्वाची संधी मिळू शकत असताना त्यांनी स्वतःच अनेक पदे भूषवली आहे. पुणे परिसरात, ज्या भागात त्या वास्तव्यास आहेत, तिथेही पक्षाचा साधा नगरसेवक निवडून आणण्यात त्यांना यश आलेले नाही. स्वतः कधीही लोकांमधून मतदान घेऊन त्या निवडून आलेल्याही नाहीत. तसेच त्यांचे वय आता 70 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे संघटना विस्तारासाठी नवीन आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे.” असे तृप्ती देसाई यांनी पत्रात म्हटले आहे.
नीलम गोऱ्हे यांना अनेकदा संधी मिळूनही पक्ष बांधणीत काम दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. काम न करणाऱ्या व्यक्तीलाच आपण जर विधान परिषद देणार असाल तर मग महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजीत बिचुकले यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी. बिचुकले हे विधान परिषदेच्या माध्यमातून कलाकारांसाठी आवाज उठवू शकतात. तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर ते थेट भूमिका घेऊन पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडू शकतील, असे देसाई यांनी पत्रात म्हटले आहे.