स्थळ : ६ ए, कृष्ण मेनन मार्ग, नवी दिल्ली. वेळ : बप्पोरे.
एप्रिल महिन्यात राजधानी दिल्लीचे वातावरण जितके आल्हाददायक असते, तेवढेच आत्ताही होते. दिल्लीत कुठलाही मौसम असो, ‘६ ए, कृष्ण मेनन मार्ग’ या माननीय गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाचे वातावरण हमेशा तापलेलेच असते. श्रीमान मोटाभाई यांचा वावर या बंगल्यात असल्याने दिल्लीचे मोर या दिशेने फिरकत नाहीत. जरा कुठे पिसारा फुलवला, तर ईडी, सीबीआयचे लोक येतील, या भीतीने मोरसुद्धा बिचकून असतात. श्रीमान मोटाभाईं बंगालच्या शिटांच्या विचार मनातल्या मनात मोठ्यांदा करत असतानाच, त्यांचा खासगी सचिव सांगत आला की, दारात कुणीतरी सामान्य माणूस आला आहे. भेट हवी म्हणतो आहेय...
अब आ गया ऊंट पहाड के नीचे!! मोटाभाईंनी ओठ चावला.
मोटाभाईंबद्दल उगीचच लोकांमध्ये गैरसमज आहेत. ते उगीचच फुकट हसत नाहीत. त्यामुळे ते गंभीर वाटतात. पण काही लाभ असेल तर मनमोकळे हसतात. सामान्य माणूस दारात आला आहे, हे ऐकून मात्र ते खीक्कन हसले! ‘मोकळ्यो’ असे त्यांनी मोकळ्या मनाने सचिवास सांगितले. सचिव हबकला. सामान्य माणूस दारात आला म्हणून नव्हे, तर मोटाभाई हसले म्हणून!!
‘‘प्रणाम, सर जी!’’ दारात एक फाटका इसम उभा होता. जाड भिंगाचा चष्मा. साधासा सदरा, गळ्यात मफलर, डोकीवर एक रुपयेवाली ‘मैं हूं आम आदमी’ असे लिहिलेली टोपी, आणि हातात झाडू.
‘‘कोण?आड्रेस चुकला काय?,’’ मोटाभाईंनी भिवई उडवून विचारले.
‘‘मी दिल्लीचा एक साधासुधा आम आदमी आहे, सरजी! दिल्लीचा कारभार स्वच्छ करायला आलो होतो! देशाचा कारभारही पारदर्शक करण्याची स्वप्नं बघत होतो...पण माझंच घर धुऊन निघालं, सरजी!,’’ आम आदमी गरीब आवाजात म्हणाला. गरीबाचा आवाज असून असून किती भारदस्त असणार?
‘‘सुं काम छे?’’ मोटाभाईंनी संशयाने विचारले.
‘‘आमचे सात खासदार बेपत्ता झाले आहेत. मिसिंगची कंप्लेंट द्यायची होती,’’ आम आदमी म्हणाला.
‘‘अडतालीस कलाक वेट करायच्या, मग कम्प्लेंट फाइल होणर!...फोटा वगैरा छे? ओळखाण कशी करणार?’’ मोटाभाईंनी पोलिसासारख्या सूचना दिल्या.
‘‘फोटा? गरीबाकडे कुठला फोटा?’’ काहीही म्हणा, आम आदमी जसा गरीबाचा सूर लावतो, तसा खऱ्याखुऱ्या गरीबालाही लावता येत नाही.
‘‘नाम-वाम, काम-शाम, अता-पता कसु तो बतावो,’’ मोटाभाई वैतागले.
‘‘राघव चढ्ढा!’’ आम आदमीने कडवटपणाने नाव घेतले.
‘‘हां हां, ते परिणीता चोपडाना हसबंड ने? हसीं तो फसी...सारी फिल्म हती,’’ क्षणभरात मोटाभाई नकळत बॉलिवुडमध्ये फेरफटका मारुन आले.
‘‘राघव चढ्ढांनी अर्धा डझन आमच्या खासदारांना घेऊन पळ काढला आहे, त्यांना शोधून द्या, सर जी!’’ आम आदमीने विनंती केली.
‘‘कोणावर वहीम?’’ मोटाभाईंनी प्राथमिक चौकशी केली.
‘‘तुमच्या पक्षाचे नवीन अध्यक्ष आहेत, नितीन नवीन नावाचे! त्यांच्यावर माझा संशय आहे, ते जवळपास माझ्यासारखेच, आय मीन आम आदमीसारखे दिसतात! त्यांनी माझाच मेकप करुन राघव चढ्ढा आणि इतर सहा खासदारांना पळवलंय, असा माझा दावा आहे. तुम्ही तक्रार दाखल करुन घ्या, सर जी!’’ आम आदमी अजीजीने म्हणाला.
‘‘नितीन नवीनजी तुमच्यासारख्या तोंडावळ्याचे आहेत, हे माझ्या आधी लक्षात आलं नव्हतं!’’ मोटाभाई चपापले.
‘‘माझे खासदार वापस करा, सरजी!’’ आम आदमी रडवेला झाला.
‘‘तमे एक काम करो, तुम्ही आत्ताच्या आत्ता राळेगणसिद्धीला जाऊन केस फाइल करा! काम होऊन ज्यानार!’’ मोटाभाई म्हणाले, आणि त्यांनी कंप्लेंट लिहून घेण्यास नकार दिला.