इराण युद्धामुळे तणाव वाढला असताना शनिवारी मध्यरात्री अमेरिकेला हादरवणारी घटना घडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसच्या पत्रकारांसाठी आयोजित डिनर पार्टीत एक बंदूकधारी घुसला आणि त्याने धडाधड सात गोळय़ा झाडल्या. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले, मात्र सिक्रेट सर्व्हिसचा एक अधिकारी जखमी झाला. हल्लेखोर कोल थॉमस अॅलन याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील वॉशिंग्टन हिल्टनमध्ये ही डिनर पार्टी सुरू होती. प्रेसिडेंट ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. वान्स, त्यांच्या पत्नी उषा वान्स हेही या पार्टीत प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. रात्री साडेआठच्या सुमारास पार्टी सुरू असताना हल्लेखोर अॅलन गोळीबार करत बॉलरूमच्या दिशेने गेला. त्याने 7 गोळय़ा झाडल्या. यात सिक्रेट सर्व्हिसचा एक अधिकारी जखमी झाला. तर दुसरा अधिकारी बुलेटप्रूफ जॅकेटमुळे वाचला. हल्ला झाल्याचे कळताच ट्रम्प आणि वान्स यांना तत्काळ सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
ट्रम्प यांनीच घडवून आणला हल्ला?
हिल्टन हॉटेलातील गोळीबारानंतर व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट चर्चेत आल्या आहेत. त्यांचे एक वक्तव्य त्यासाठी कारण ठरले आहे. ‘आज रात्री डिनरच्या वेळी काही गोळय़ा झाडल्या जाण्याची शक्यता आहे,’ असे भाकीत फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केले होते. त्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. लेव्हिट यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनीच हा हल्ला घडवून आणला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अॅलन ‘नासा’चा फेलो!
हल्लेखोर कोल थॉमस अॅलन हा 31 वर्षांचा आहे. तो कॅलिफोर्नियातील टोरान्स येथील राहणारा असून सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. तो शिक्षक म्हणूनही काम करतो. गेम डेव्हलपर म्हणूनही त्याने काम केले आहे. अॅलन हा 2014 साली ‘नासा’च्या समर अंडरग्रॅज्युएट रिसर्च फेलोशिपमध्येही सहभागी झाला होता.
इराणचा संबंध नाही! – ट्रम्प
या घटनेशी इराणचा संबंध नाही, असे ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ‘बूम बूम बूम बूम… असा आवाज आम्ही ऐकला. काचेचे ट्रे पडले असावेत असे मला आधी वाटले, मात्र नंतर उलगडा झाला. हल्लेखोर आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच पकडले. सुरक्षा रक्षकांनी चांगली कामगिरी केली, असे ट्रम्प म्हणाले.
लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, मोदींकडून निषेध
वॉशिंग्टन डी. सी. येथील गोळीबाराच्या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे निषेध केला. ‘राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स हे सुखरूप व सुरक्षित असल्याचे ऐकून बरे वाटले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. अशा घटनेचा निःसंदिग्धपणे निषेधच केला पाहिजे,’ असेही मोदी म्हणाले.
ट्रम्प आणि इतर मंत्री टार्गेट असल्याचा अंदाज
‘या घटनेचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. माझे काम जोखमीचे आहे, पण मी खचून जाणाऱ्यांपैकी नाही. पुढच्या महिनाभरात व्हाईट हाऊसच्या पत्रकारांसाठी पुन्हा डिनर पार्टी ठेवली जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. हल्लेखोर अॅलनचे टार्गेट डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सरकारमधील अधिकारी असावेत, असा संशय अमेरिकेचे अॅटर्नी जनरल टॉड ब्लांच यांनी व्यक्त केला आहे. अॅलनकडचे लॅपटॉप, मोबाईल, त्याच्या लिखाणावरून तपास अधिकाऱ्यांनी हा अंदाज बांधला.
जीव वाचवण्यासाठी टेबलाखाली लपले
हल्ला झाला तेव्हा पत्रकार व इतर मान्यवर जेवणाचा आस्वाद घेत होते, तर डोनाल्ड ट्रम्प हे व्यासपीठावर पत्रकारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत होते. त्याचवेळी बाहेर जोरजोरात आवाज झाला. कोणाला काही कळण्याच्या आत सुरक्षा रक्षकांनी सर्वांना टेबलाखाली लपण्यास सांगितले. जिवाच्या भीतीने काही लोक टेबलाखाली गेले. ज्यांना जागा मिळाली नाही ते जमिनीवरच आडवे झाले. हल्लेखोराला पकडल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
याच हॉटेलात झाला होता रोनाल्ड रेगन यांच्यावर हल्ला
व्हाइट हाऊसच्या डिनर पार्टीवर जिथे हल्ला झाला, त्याच वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलात 30 मार्च 1981 रोजी अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. रेगन यांच्यावर अवघ्या सहा सेकंदांत सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीवर लागली होती. अन्य तिघेही जखमी झाले होते. रेगन यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते बचावले होते. आजच्या हल्ल्यामुळे चार दशकांपूर्वीच्या त्या आठवणी जाग्या झाल्या.