राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील केंद्र चालकांचा पाठिंबा, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा April 27, 2026 10:43 AM

Agricultural Service Center Owners Strike जळगाव : राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत बंद (Strike) ठेवण्याचा निर्णय खते आणि बियाणे विक्रेत्यांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या जाचक धोरणाच्या विरोधासह विविध मागण्यासाठी कृषी केंद्र चालकांच्या माफदा (MAFDA) संघटनेतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाला देशभरातील अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांनी (Agricultural Service Center Owners) पाठिंबा दिला आहे. कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉसमशीन शासनाकडे जमा करण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे. माफदा संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी जळगाव येथे बोलताना हि माहिती दिली आहे.

देशभरामधील काही राज्यासह, महाराष्ट्र राज्यातील सर्व 85 हजार कृषी सेवा केंद्र 27 एप्रिलपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय माफदा संघटनेने दिला आहे. केंद्र तथा राज्य सरकारकडून घेण्यात आलेले निर्णय हा कृषी केंद्र चालकांच्या विरोधात आहेत, त्या निर्णयात बदल करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नेमक्या मागण्या काय? (Agricultural Service Center Owners Strike)

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांच्या विक्रीविरोधात खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या ‘लिंकिंग’ पद्धतीला विरोध, तसेच अवैध कीटकनाशके व खते थेट शेतकऱ्यांना एजंटमार्फत विक्री रोखण्याची मागणी यांचा समावेश आहे. तसेच, ‘साथी’ पोर्टलद्वारे बियाणे विक्री सक्तीची करण्याच्या निर्णयाला संघटनेचा तीव्र विरोध असून, किरकोळ खत विक्रेत्यांवर लादण्यात आलेल्या जाचक नियमांमुळे व्यवसाय करणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. कीटकनाशक कंपन्यांकडून एक्सपायरी मटेरियल परत न घेण्याच्या धोरणावरही नाराजी व्यक्त करण्यात आली. नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्यांमुळे विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, सरकारने तातडीने या सर्व मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा बंद आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Hingoli: राज्यातील कृषी केंद्र चालकांचा बेमुदत संप, हिंगोली जिल्ह्यातील 700 केंद्राचालक संपत सहभागी

राज्यभरात माफदा संघटनेच्या वतीने कृषी केंद्र आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या बंदमध्ये हिंगोली जिल्ह्यातील 700 कृषी केंद्र चालक सहभागी झाले आहे. परिणामी, कृषी केंद्र पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय या कृषी केंद्र चालकांनी घेतला आहे. खते आणि बियाणे विक्रेत्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाच्या जाचक धोरणांच्या विरोधात आणि विविध मागण्यासाठी आजपासून हा संप पुकारला असून विविध मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील, अशी भूमिका कृषी केंद्र चालकांनी घेतली आहे.

Agricultural News : एका महिन्यावर खरिपाची पेरणी, शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता

अनाधिकृत एसटीबीटी बियाण्यांच्या विक्री विक्री थांबवावी यासह खत कंपन्यांकडून सर्रास केली जाणारी लिंकिंग पद्धत बंद करावी, यासह अवैध कीटकनाशके व खते थेट शेतकऱ्यांना एजंट मार्फत जे विक्री होतात, ही विक्री पूर्णपणे थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी आज हा संप पुकारला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. कारण सध्या एकाच महिन्यावर खरिपाची पेरणी येऊन ठेपली असून शेतकरी खाते बियाण्यांची खरेदी करत आहेत. अशा मध्येच हा संप सुरू झाल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.