Maharashtra Heatwave: काळजी घ्या! राज्यात उन्हाचा तडाखा... अकोल्यात ४६.९ अंशांची नोंद, २२ शहरांत ४० पार!
esakal April 27, 2026 11:45 AM

पुणे : राज्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला असून, महाराष्ट्रातील तब्बल २२ शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भाग अक्षरशः होरपळून निघाले आहेत. अकोला येथे रविवारी राज्यातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती ४६.८ आणि वर्धा येथे ४६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. सोमवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..


राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण विरोधाभास अनुभवायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला असून नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे कुठे उष्णतेचा ‘यलो अलर्ट’, तर कुठे पावसाचा इशारा अशा दुहेरी परिस्थितीचा सामना राज्याला करावा लागत आहे. पुणे शहरातही तापमानात मोठी वाढ झाली असून कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. कोरेगाव पार्क आणि लोहगाव परिसरात तब्बल ४३ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव अजूनही कायम आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतात उत्तर कर्नाटकपासून ते कन्याकुमारीपर्यंत वाऱ्यांची खंडित अवस्था तयार झाली आहे. तसेच, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि मध्य प्रदेशच्या मध्यभागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण बदलत आहे. काही राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक राहणार आहे. या सर्व प्रक्रियांमुळे राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल होत आहेत.

सात वर्षांनंतर अकोल्याचा विक्रम

अकोला/नागपूर : विदर्भात रविवारी उष्णतेच्या लाटेचा कहर झाला असून, अकोल्यात ४६.९ अंश एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी अधिक आहे. अकोल्यात याआधी एप्रिल २०१९ मध्ये ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. प्रखर उन्हामुळे दुपारच्या सुमारास सर्वच शहरांतील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांत शुकशुकाट होता.

देशातील उच्चांक

अकोल्यातील ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची केवळ राज्यातीलच नव्हे, तर रविवारचे देशातील सर्वाधिक तापमान म्हणून नोंद झाली. सर्वाधिक तापमान असलेल्या पहिल्या पाच शहरांपैकी तीन शहरे महाराष्ट्रातील आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील अकोला आणि अमरावतीनंतर तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील बांदा (४६.६) येथील तापमानाची नोंद झाली. चौथ्या क्रमांकावर वर्धा, तर पाचव्या क्रमांकावर राजस्थानमधील बारमेर (४६.४) मधील तापमानाची नोंद झाली.

विदर्भात उष्णतेची लाट

विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने सोमवारी (ता. २७) हवामानशास्त्र विभागाने या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे. तर भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेच्या शक्यतेमुळे ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारनंतर तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

कोरेगाव पार्कमध्ये तापमान ४३°

शहरात उन्हाचा चटका आणखी तीव्र झाला असून, रविवारी (ता. २६) कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले, तर लोहगाव आणि कोरेगाव पार्क परिसरात तब्बल ४३ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. मागील आठवड्यात काही भागांत गारांसह पाऊस झाला असला, तरी त्यानंतर हवामानातील सततच्या बदलांमुळे उष्णतेची तीव्रता पुन्हा वाढली आहे. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सतत वाढ होत असल्याने सकाळी आणि दुपारी कडक ऊन, तर सायंकाळी ढगाळ वातावर असे चित्र आहे, तसेच किमान तापमानात वाढ झाल्याने रात्रीदेखील उकाडा वाढला आहे. पुणे आणि परिसरात सोमवारी (ता. २७) कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जाईल.

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली.. काय काळजी घ्याल?

जास्तीत जास्त पाणी प्या.

ओआरएस, लिंबूपाणी, ताक यांचे सेवन करा

दुपारी बाहेर पडताना डोक्याला टोपी वा रुमाल बांधा

सुती आणि सुटसुटीत पोशाख परिधान करा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.