माणूस चित्त्याप्रमाणे धावू शकत नाही. कारण मानवी शरीराला काही मर्यादा आहेत. मात्र अनेकवेळा आपण या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतो. त्यात सर्वांनाच यश येतं असं नाही. पण काही जण मानवी शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन असा काही कारनामा करून दाखवतात की जग थक्क होतं. लंडनमध्ये रविवारी झालेल्या मॅरेथॉनमध्ये अशाच एका अवलियानं जगाला थक्क करून सोडलं. ज्याचं नाव सॅबेस्टियन सावे.
केनियाचा 31 वर्षांचा सॅबेस्टियन सावे लंडन मॅरेथॉनमध्ये (London Marathon) धावण्यासाठी उतरला तेव्हा कुणी कल्पनाही केली नसेल की आज हा काहीतरी जगावेगळं करेल. कारण सावेनं पुढच्या दोन तासांच्या आत एका जागतिक विक्रमाला गवसणी घातली. सावेनं लंडन मॅरेथॉन अवघ्या 1 तास 59 मिनिटं आणि 30 सेकंदात पूर्ण करत नवा इतिहास घडवला. असं करणारा तो आजवरचा जगातला पहिलाच धावपटू ठरला.
2023 साली शिकागो मॅरेथॉनमध्ये केनियाच्याच केल्व्हिन किप्टमनं 2 तास 35 सेकंदात शर्यत पूर्ण करत सर्वात कमी वेळेचा विक्रम नोंदवला होता. मात्र यंदाच्या लंडन मॅरेथॉनमध्ये केल्व्हिनचा हा विक्रम एकट्या सॅबेस्टियन सावेनेच नव्हे तर याच शर्यतीत दुसरा आलेल्या योमिफ केजेल्चानंही 1 तास 59 मिनिटं आणि 41 सेकंदात पूर्ण केली. म्हणजेच एकाच वेळी दोघांनी दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा आणि किप्टमचा विक्रम मोडण्याचा पराक्रम गाजवला. दुर्दैवानं स्वत:चा विक्रम मोडीत निघाला हे पाहण्यासाठी किप्टम आज या जगात नाही. 2024 मध्ये केनियातील एका रस्ते अपघातात 24 वर्षांच्या किप्टमचा आणि त्याच्या प्रशिक्षकाचा मृत्यू झाला.
सॅबेस्टियन सावेनं या ऐतिहासिक कामगिरीसाठी वापरलेले शूज सध्या चर्चेत आहेत. अदिदास कंपनीचे Adizero Adios Pro Evo 3 हे सूपर शूज घालून सावेनं ही शर्यत विक्रमी वेळेत पूर्ण केली. या शूजचं वजन अवघं 96 ग्रॅम इतकं आहे. हे शूज जगातील सर्वात हलके शूज म्हणून ओळखले जातात. यामध्ये नवीन 'लाईटस्ट्राईक प्रो इव्हो' (Light strike Pro Evo) फोम आणि 'एनर्जी ग्रिम' (ENERGYGRIM) नावाची प्रगत कार्बन तंत्रज्ञान प्रणाली वापरण्यात आली आहे. ज्यामुळे धावताना ऊर्जा कमी खर्च होते आणि धावतानाचा वेग वाढण्यास मदत होते. हे शूज इतके हलके आहेत की ते फक्त एका शर्यतीसाठी डिझाईन केले जातात. ज्याची किंमत 500 डॉलर्स म्हणजेच जवळपास 50 हजार रू. इतकी आहे.
सॅबेस्टियन सावेच्या वेगवान धावगतीचं सर्वात मोठं रहस्य त्याच्या सरावात दडलंय. केनियामधील एल्डोरेट (Eldoret) इथल्या उंचावरच्या भागात तो सराव करतो. समुद्रसपाटीपासून जवळपास 2400 ते 2800 मीटर उंचीवरच्या या शिस्तबद्ध सरावामुळे त्याच्या शरीरातील लाल रक्तपेशींची क्षमता वाढते. ज्यामुळे फुफ्फुसांना जास्त ऑक्सिजन मिळतो आणि शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात थकवा जाणवत नाही. सावे दर आठवड्याला 180 ते 210 किलोमीटर धावतो. ज्यामध्ये लांब पल्ल्याच्या धावण्यासोबतच 'इंटरव्हल ट्रेनिंग' आणि डोंगर चढण्याचा सराव समाविष्ट आहे. सावे प्रामुख्याने 'फाटलॅक' (Fartlek) धावण्यावर भर देतो, ज्यामुळे त्याला आपला वेग हवा तसा बदलता येतो. याशिवाय केनियन धावपटूंचा नैसर्गिक आहार ज्यामध्ये 'उगाली' म्हणजेच मक्याच्या पिठापासून बनवलेला एक पदार्थ आणि ताजी फळे यांचा समावेश असतो. यामुळे शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. म्हणूनच आज जगातील लांब पल्ल्यांच्या शर्यतींमध्ये केनियन धावपटू वर्चस्व गाजवताना आपल्याला दिसतात.
सॅबेस्टियन सावेचा प्रवास केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमधील एका अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातून सुरू झाला. लहानपणी शाळेत जाण्यासाठी दररोज अनवाणी धावत जावं लागायचं. तीच सावेच्या भविष्यातील विक्रमी धावेची खरी सुरूवात म्हणावी लागेल. आजही केनियातील अनेक मुलं केवळ छंद म्हणून नव्हे तर गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून मॅरेथॉन किंवा इतर शर्यतींमध्ये भाग घेतात. सावेच्या बाबतीतही तेच घडलं. त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 10 किमी आणि हाफ मॅरेथॉनपासून केली. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरीनं जागतिक स्तरावर त्यानं जागतिक स्तरावर आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आज एक 'वर्ल्ड क्लास रनर' म्हणून त्याने मिळवलेले यश हे त्याच्या संघर्षाचं आणि जिद्दीचं प्रतिक आहे.