तुम्ही दुर्लक्ष केले म्हणून वस्तुस्थिती बदलत नसते. — ऑड्स हक्सले
सध्या देशभरात उष्णतेच्या झळा वाढल्या असून, अनेक ठिकाणी तापमानाने ४२ ते ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्रात; विशेषतः विदर्भात तर सूर्याचे आग ओकणे म्हणजे काय, याचा दाहक प्रत्यय येत आहे. याचे परिणाम केवळ एका क्षेत्रावर नव्हे तर सर्वच क्षेत्रांवर घडतात. त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. पशुपक्ष्यांनाही त्रास होतो. शेतीउत्पादन खालावते. पाणीटंचाई तीव्र बनते. देशाच्या कानाकोपऱ्यात जाणवत असलेल्या उष्णतेचा प्रकोप हा हवामानबदलाचा आणि त्याला कारणीभूत असलेल्या वाढत्या कार्बन उत्सर्जनाचाही परिपाक म्हणावा लागेल. खरे तर या पापाचे खरे धनी ही विकसित राष्ट्रे आहेत; पण त्याचा सर्वाधिक फटका हा मात्र गरीब, विकसनशील देशांना सहन करावा लागतो आहे. कार्बनचे उत्सर्जन रोखण्यासाठी अमेरिकेसारखा देश बांधिलकी स्वीकारण्यास तयार नाही. दरडोई ऊर्जावापर जास्त असलेल्या देशानेच जर याबाबतीत असे हात झटकले तर पृथ्वीला अनिष्ट परिणामांपासून वाचवण्याच्या उद्दिष्टात अडथळा निर्माण होईल. त्यामुळे विकसनशील देशांनी पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आणायला हवा. डोईवर तळपणाऱ्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्या ज्या चुका ठळकपणे दिसत आहेत, त्या दुरुस्त करायला हव्यात.
या दीर्घ पल्ल्याच्या व्यापक उपाययोजनांबरोबरच तातडीचे उपायही करायला हवेत. महाराष्ट्रातील बहुतांश शहरांतील तापमानाने केव्हाच चाळीशी ओलांडली आहे. विदर्भातील अकोल्यात ४६.९ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी जास्त आहे. हा पारा पन्नाशीही ओलांडू शकतो, असा इशारा देण्यात येत आहे. तसे झाले तर आकाशाच्या ‘छता’खाली काम करणाऱ्या शेतकरी आणि कामगारांचे काय होणार, याची कल्पनादेखील करवत नाही. मोठी शहरे ही उष्णतेची बेटे बनत चालली असतानाच नागरीकरणाच्या मार्गावर बेफाम धावणाऱ्या गावांची अवस्था ही ‘आगीतून आणखी आगीत’ अशी होत चालली आहे. पेयजलाच्या टंचाईचा प्रश्न गंभीर रूप धारण करत चालला आहे. देशातील १६६ मोठ्या जलाशयांमध्ये केवळ ४१ टक्के एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांत या समस्येने अधिक उग्र रूप धारण केले आहे. शहरांतील टंचाईच्या व्यथा या किमान माध्यमांपर्यंत पोचतात तरी. पण दुर्गम भागांतील गावे अन् पाड्यांचे काय? घोटभर पाण्यासाठी ज्यांची अनेक मैल पायपीट सुरू असते अशा आदिवासी महिलांच्या वेदनांचे काय? अनेक मुलांना या वाढत्या उष्णतेपायी शिक्षण सोडावे लागते. आता शहरांमध्ये याच उष्णतेने शाळांच्या वेळांमध्ये बदल घडवून आणला. वाढत्या उन्हामुळे शेतशिवाराची अवस्था आणखी बिकट होईल, यात शंकाच नाही. आधीच ‘एल-निनो’चे सावट. युद्धामुळे खतांची टंचाई, इंधनाच्या किमती कधीही वाढतील, अशी स्थिती. यासंदर्भात आतापासूनच युद्धपातळीवर काही गोष्टी कराव्या लागतील. जलपुनर्भरणासारख्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे लागेल. संकट कोणतेही असो, त्यावर मार्ग हा सापडतोच; फक्त त्याबाबत प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असते. ‘संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना’ आणि ‘जागतिक हवामान संघटना’ यांनी संयुक्तरीत्या एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. वारंवार उद्भवणाऱ्या उष्णतेच्या लाटांनी भारतीय शेतीचे नुकसान केले असून, उपाययोजनांबाबतच्या उदासीनतेवर बोट ठेवले आहे. ‘अतिउष्णता आणि शेती’ या विषयावरील हा पहिलाच संयुक्त अहवाल आहे. त्यात भारतातील कृषी संशोधन संस्थांच्या आकडेवारीचा उपयोग करण्यात आला आहे. अतिउष्णतेमुळे संपूर्ण कृषिव्यवस्था कशी विस्कळीत होऊ शकते, हे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. मागील काही वर्षांत जागतिक तापमानात सातत्याने वाढ झाली असून ती औद्योगिक अवस्था पूर्वपातळीपेक्षा सुमारे १.४८ अंशांनी जास्त आहे. तसेच, या वाढीचा वेगही अभूतपूर्व आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
उत्तर भारतातील विस्तीर्ण मैदानी भागातील शेती कामगारांची कार्यक्षमता या शतकाच्या अखेरीस ४० टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकते. उष्णता आणि आर्द्रतेच्या संयुक्त परिणामांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. याचा थेट परिणाम शेतीक्षेत्रात मजुरांची टंचाई वाढण्यात होऊ शकते. उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढून जमिनीतली ओल कमी होते. परिणामी सिंचनाची गरज वाढते; पण सध्या पाण्याचा पुरवठा कमी पडतो आहे. ही उष्णता-दुष्काळ साखळी भारतीय शेतीसाठी सर्वांत मोठा धोका ठरू शकते, असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे. शेतीबाबत उद्भवणारे हे अरिष्ट टाळण्यासाठी उष्णतासह्य बियाणे, सूक्ष्म सिंचन, पाणीबचत तंत्र, हवामान इशाऱ्यांनुसार कार्यवाही, पशुधनासाठी सावली-थंडाव्याची सोय आणि शेतमजुरांसाठी सुरक्षित कामाची व्यवस्थाउभारणी, ही तातडीची गरज आहे. तसेच, शेतीपद्धतीला हवामान बदलांशी जुळवून घेण्यासाठी स्थानिक पातळीवरही नियोजन करायला हवे. उन्हाच्या तीव्र झळा ‘झाडे लावा, झाडे जगवा’ याचे खरे महत्त्व पटवून देतात.
मोठी शहरे ही उष्णतेची बेटे बनत चालली असतानाच नागरीकरणाच्या मार्गावर बेफाम धावणाऱ्या गावांची अवस्था ही ‘आगीतून आणखी आगीत’ अशी होत चालली आहे.