आयपीएल 2026 स्पर्धेत दिग्गज खेळाडूंचा संघ असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची पुरती वाट लागली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं कठीण दिसत आहे. त्यामुळे उर्वरित प्रत्येक सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. अशा स्थितीत संघाला फलंदाजीत आश्वासक सुरूवात करून देणं गरजेचं आहे. यासाठी अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्माची प्रकर्षाने उणीव भासत आहे. 29 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लढत होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पण या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही असा प्रश्न आहे. मागच्या काही सामन्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्यामुळे या सामन्यासाठी फिट झाला आहे की नाही हा प्रश्न आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने अपडेट दिले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर अपडेट देताना सांगितलं की, रोहित शर्मा वेगाने बरा होत आहे. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याचा निर्णय नाणेफेकीच्या वेळी घेतला जाईल. त्यांच्या या वक्तव्यामुळे रोहित शर्माचं पुढच्या सामन्यात खेळणंही कठीण असल्याचं बोललं जात आहे. रोहित शर्माने पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करून आपला फॉर्म दाखवून दिला होता. पण आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली. त्यामुळे तीन सामन्यात खेळता आलं नाही. पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही.
मुंबई इंडियन्सचा हैदराबादनंतर पुढचा सामना 2 मे रोजी होणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग 11 चा भाग असण्याची शक्यता आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जाईल. मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 103 धावांनी पराभूत केलं होतं. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 207 धावा केल्या होत्या. तकर मुंबई इंडियन्स संघ 104 धावांवर सर्व बाद झाला होता. आता या पराभवाचा वचपा आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं भाग आहे.