IND vs ENG : टीम इंडिया मे महिन्यात इंग्लंड विरुद्ध भिडणार, पाहा वेळापत्रक
GH News April 29, 2026 12:11 AM

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात (India Women Tour Of South Africa 2026) अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 4-1 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यामुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेहून रिकाम्या हाती परतावं लागलं. आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वुमन्स टीम इंडियाकडून चाहत्यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शानदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र महिला ब्रिगेडने निराशा केली. टीम इंडियाला फक्त 1 सामनाच जिंकता आला. त्यानंतर आता वुमन्स टीम इंडिया मे महिन्यात इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडियाच्या या इंग्लंड दौऱ्याबाबत जाणून घेऊयात.

वूमन्स टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 2026

टीम इंडिया मे ते जून दरम्यान इंग्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. उभयसंघात 3 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचं आयोजन हे 28 मे ते 2 जून दरम्यान करण्यात आलं आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला मोजून काही दिवसच बाकी आहेत. अशात वुमन्स टीम इंडियासमोर इंग्लंड विरुद्ध मालिका जिंकून टी 20 वर्ल्ड कपआधी कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. तसेच उभयसंघात एकमेव कसोटी सामना नियोजित आहे. मात्र हा सामना टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जुलै महिन्यात खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धची ही टी 20 वर्ल्ड कपआधीची शेवटची मालिका असणार आहे. त्यामुळे निवड समितीचं खेळाडूंच्या कामगिरीकडे बारीक लक्ष असणार आहे. तसेच इंग्लंड विरुद्ध दमदार कामगिरी करुन भारतीय संघात वर्ल्ड कपसाठी दावा ठोकण्याची संधी आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी ही मालिका अतिशय निर्णायक ठरणार आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 28 मे, इंग्लंड-भारत, चेम्सफोर्ड

दुसरा सामना, 30 मे, इंग्लंड-भारत, ब्रिस्टल

तिसरा सामना, 2 जून, इंग्लंड-भारत, टॉनटन.

इंग्लंड-इंडिया टी 20 मालिका

उभयसंघातील पहिला सामना हा 28 मे रोजी चेम्सफोर्डमध्ये होणार आहे. दुसरा क्रिकेट सामना 30 मे रोजी ब्रिस्टलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना 2 जून रोजी टॉनटनमध्ये होणार आहे. महिला ब्रिगेड या मालिकेत कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.