- जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
शाळेच्या मागील बाजूस असलेला कचरा पेटला आणि तेथून सर्वजण पळत सुटले. सगळीकडे धूर पसरला. मधली सुट्टी संपली, बेल झाल्यावर वर्गात सगळेजण आले. कचरा कोणी? कसा पेटवला? हे मात्र कळत नव्हते. कोणीही काही सांगत नव्हते. खिडकीतून गंमत पाहणाऱ्या हर्षवर्धनने सरांना कचरा पेटविणाऱ्यांची नावे सांगितली. त्यात प्रमुख होता अथर्व.
समस्या
अथर्व आठवीत होता. तो घरी-शाळेत सतत वेगवेगळे प्रयोग करायचा. परंतु पुरेशी काळजी न घेतल्यामुळे अनेकदा असे प्रसंग ओढवून घेत असे. शाळेत सगळ्यांची आणि पालकांचीही नेहमी अशीच तक्रार असायची. त्याच्या या खोडकरपणाची सर्वांना सवय झालेली होती.
निरीक्षण/नोंदी
खरेतर अथर्वला शिक्षकांच्या शिकवण्यामुळे विज्ञानाची खूपच गोडी लागली होती. लहानपणापासून ‘प्रत्येक गोष्ट कशी आहे?’ या जिज्ञासेतून तो असे करीत असे. नवी खेळणी तोडणे, काल-परवा आणलेल्या सायकलची घंटी काढून मोकळी करणे, मेणबत्तीचे विरघळलेले मेण अंगावर सांडता-सांडता राहणे, नवीन व जुनाट बॅटरी/सेलमधील फरक शोधण्यासाठी ते उघडून पाहणे असे एक-ना-अनेक उपद्व्याप करीत असे. परंतु हे सारे त्याच्यातील कुतूहलातून घडत असते. एव्हाना हे सर्वांना माहिती झालेले होते. परंतु गरज होती, त्याला योग्य दिशा देण्याची. त्याला रागवून किंवा शिक्षा करून, हा प्रश्न सुटणार नव्हता. त्यासाठी वेगळा विचार करणे गरजेचे होते.
कोणत्याही गोष्टीचे चांगले-वाईट परिणाम याबाबत अथर्व आणि त्याच्या मित्रांशी सरांनी चर्चा केली. त्यांना प्रेमाची सक्ती केली. तसेच त्यांना आवडणारे स्वातंत्र्यही बहाल केले. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी सरांशी चर्चा करायची त्याला लागणारे साहित्य, अपेक्षित परिणाम, संभाव्य धोके, घ्यावयाची काळजी यांची साधक-बाधक चर्चा करायची. त्यानंतरच तो प्रयोग करायचा. भले तो अभ्यासक्रमाशी संबंधित नसला, तरी चालेल. रोजचा अभ्यास केल्यानंतर असे प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा त्यांच्यासाठी खुली असेल, असे ठरले. त्यामुळे ते सर्वजण खूष झाले.
धोरणात्मक प्रयत्न
या सगळ्या गोष्टींचा फायदा त्याच्या भवितव्याशी निगडीत होता. आठवीत असल्यापासूनच नववीत असलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेची तयारी होईल. त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी आतापासून करता येईल, या दृष्टीने सरांनी आराखडा तयार केला.