नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election) निवडणुकीत मविआच्या वाट्याला एक जागा येणार आहे. या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर काँग्रेस (Congress) देखील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमदेवार देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत सुरु असलेल्या घडामोडींसदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं आहे. ते म्हणाले की शेवटी तिन्ही पक्षांची आघाडी आहे, राज्यसभेला शरद पवारांचे नाव आलं होतं त्याला दोन्ही पक्षांनी मान्यता दिली. पुढील जागा शिवसेना - काँग्रेस यांच्यात विभागल्या जातील हे स्पष्ट होतं, असं सर्वाचं मत होतं. जर शिवसेनेला उमेदवार तशा पद्धतीनं द्यायचा होता तर त्यांनी काँग्रेस सोबत पक्ष नेतृत्त्वासोबत बोलायला पाहिजे. कदाचित बोललं गेलं असेल , मला नेमकं माहिती नाही, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.
शेवटी याच्यातून काही तरी मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. तीन पक्षांची आघाडी आहे, आम्ही एकत्रितपणे पुढं गेलो आहे. शिवसेनेने उमेदवार द्यायचा तर प्रांताध्यक्षाशी बोलावे लागेल , न बोलता उमदेवार देतो असं म्हटलं गेलं तर अडचणीचं ठरेल, असं माणिकराव ठाकरेंनी म्हटलं. कोणाचं नाव असलं तरी बोललं गेलं पाहिजे. उद्धव ठाकरे जी मोठे नेते, त्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यामुळे दुसरा उमेदवार देण्याचा विषयच नाही असं सर्वांना वाटत होतं. दुसरा उमेदवार द्यायचा असेल तर प्रताध्यक्षांशी बोललं पाहिजे.एकमेकांशी बोललं पाहिजे. तिन्ही पक्ष मिळून एक उमेदवार द्यायचा असतो त्यामुळं चर्चा होणं अपेक्षित आहे, असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं.
अंबादास दानवे यांनी जे म्हटलं आहे ते स्वाभाविक आहे. तीन पक्ष मिळून एक उमेदवार दिला जाऊ शकतो. अंबादास दानवे यांनी आघाडीचा उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. चर्चा करता येईल, आणखी वेळ आहे,माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलं. काँग्रेसनं उमेदवार दिलेला नाही, प्रांताध्यक्षांनी उमेदवार देऊ असं म्हटलं आहे. याला पाठिंबा द्यायचा की त्याला पाठिंबा द्यायची वेळ येणार नाही, मला वाटतं आज दिवसभरात काही तरी घडामोडी घडतील आणि चर्चा होईल, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.
आतापर्यंत हातात हात घालून चाललो आहोत.महाविकास आघाडीत अशा प्रकारचा प्रत्यय आलेला नाही एकमेकांच्या विरोधात लढलेत, या स्थितीत एकमेकांविरोधात टोकाची भूमिका किंवा तशा प्रकारचं स्टेटमेंट करणं उचित नाही, असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.