Pune Robbery: मेंदीच्या कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून ५ लाखांची सोनसाखळी लुटणारे पाच जण अटकेत
esakal April 30, 2026 03:45 AM

पुणे : विवाह समारंभातील मेंदीच्या कार्यक्रमात एका टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून पाच लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना फुगेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक केली.

याप्रकरणी नंदू अर्जुन काची (वय ५३, रा. फुगेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.संतोष दशरथ काची, यश संतोष काची (दोघे रा. ममतानगर, सांगवी, पिंपरी-चिंचवड), दत्ता रघुनाथ चव्हाण (रा. वारजे), सुशील सूर्यकांत गौड (रा. पाटील इस्टेट, जुना मुंबई-पुणे रस्ता) आणि यश दीपक सावंत (रा. जुनी सांगवी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता काची यांच्या घरी २७ एप्रिल रोजी रात्री मेंदीचा कार्यक्रम सुरू होता. आरोपींनी फिर्यादी नंदू काची यांना शस्त्राचा धाक दाखवत त्यांची पाच लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून घेतली. आरोपींनी त्यांना मारहाण करून तेथून पोबारा केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन सावंत करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.