विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी भाजप अतिरिक्त उमेदवार देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात आलेला नाही, त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 9 जागांचा कोटा होता, यामध्ये भाजपच्या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्येकी एका उमेदवाराने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेत होतं. परंतु शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळेस अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. जर उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली तर आम्ही उमेदवार देणार नाही असं शिवसेना शिंदे गट आणि भाजपने म्हटलं होतं. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजप तसेच शिवसेनेकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. अंबादास दानवे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काँग्रेसचा ही पाठिंबा
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे काँग्रेसने देखील नाराजी व्यक्त केली होती. तसेच उमेदवार देण्याचे संकेत देखील दिले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यानी अंबादास दानवे यांना आपाला पाठिंबा जाहीर केला आहे. कोणताही अतिरिक्त उमेदवार नसल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.