मुंबई : राजधानी मुंबईत (Mumbai) घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (Mhada) गुडन्यूज आणली असून घरांच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या संगणकीय सोडतीअंतर्गत विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील 1221 सदनिकांच्या किमतीत 7.5 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे, मुंबईत म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्या आणि घराची (Home) किंमत जास्त असल्याने माघार घेणाऱ्या उमेदवारांना, अर्जदारांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. या 1221 घरांसाठी म्हाडाकडून 30 मार्च 2026 रोजी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
संकेत क्रमांक 538, बिल्डिंग क्र. 2 अ, ब, पॉकेट-2, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील 480 सदनिकांची विक्री किंमत 1 कोटी 45 लाख 58 हजार 307 ते 1 कोटी 47 लाख 97 हजार 992 इतकी होती. तर, संकेत क्रमांक 539, बिल्डिंग क्र. 3 अ, ब, क, पॉकेट-2, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील 741 सदनिकांची विक्री किंमत 1 कोटी 45 लाख 74 हजार 942 ते 1 कोटी 48 लाख 14 हजार 901 इतकी होती. सदर सदनिकांच्या किमतीत प्रती सदनिका 7.5 टक्के कपात करण्यात येऊन सुधारित किंमती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, येथील घरांच्या किंमतीत तब्बल 10 ते 11 लाख रुपयांची कपात झाल्याचं दिसून येत आहे. नव्या किंमतीनुसार, संकेत क्रमांक 538 येथील घरांची किंमत 1 कोटी 34 लाख 66 हजार 434 ते 1 कोटी 36 लाख 88 हजार 143 रुपये एवढी करण्यात आली आहे. तसेच, संकेत क्रमांक 539 विक्रोळी येथील 741 घरांची किंमत कमी करुन 1 कोटी 34 लाख 81 हजार 821 ते 1 कोटी 37 लाख 03 हजार 783 रुपये एवढी करण्यात आली आहे.
सदर प्रकल्पातील प्रत्येक सदनिकेस 1 वाहनतळ (पार्किंग) विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी सोडतीसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, म्हाडाच्या 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रिया 30 मार्च 2026 पासून सुरू करण्यात आली असून अधिकाधिक नागरिकांना सहभाग घेता यावा यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलंय. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 14 मे 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर, या घरांसाठीची संगणकीय सोडत 5 जून 2026 रोजी काढण्यात येणार आहे.