Water Shortage : पुणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा! आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार
esakal May 01, 2026 03:45 AM

पुणे - पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील ८९ हजार नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाली असून, आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांबरोबरच दोन हजारांहून अधिक पशुधनांसाठीही टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत.

आंबेगाव तालुक्यात महिनाभरापूर्वी केवळ तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र आता ही संख्या वाढून २१ वर पोहोचली आहे. सध्या सहा तालुक्यांमध्ये दोन शासकीय आणि ४८ खासगी अशा एकूण ५० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७७६ गावांमध्ये टंचाई निवारण उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत ३,३३० कामे प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे ३५ कोटी ६४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अशी आहे सद्य:स्थिती

  • ५० - एकूण टँकर

  • ५० - गावांची संख्या

  • २५६ - वाड्यांची संख्या

  • ८९,८१३ - टँकरद्वारे पाणीपुरवठा होणारी लोकसंख्या

  • २,६०८ - टँकरद्वारे पाणीपुरवठा होणारे पशुधन

टँकर सुरू असलेले तालुके -

आंबेगाव, भोर, हवेली, जुन्नर, शिरूर, खेड आणि पुरंदर

टँकर सुरू नसलेले तालुके -

बारामती, इंदापूर, दौंड, मावळ, मुळशी आणि राजगड

जलजीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांमध्ये टँकरची गरज भासलेली नाही. मात्र, ज्या वाड्या-वस्त्या योजनेत समाविष्ट करण्याच्या राहिल्या, त्या ठिकाणी टँकर सुरू करावे लागले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या कमी आहे. तसेच हातपंप बसविणे व इतर उपाययोजनांचे काम सुरू आहे.

- अमित पाथरवट, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा

पाऊस चांगला झाला असला तरी सध्या पाण्याची गरज भासत आहे. माळीणच्या पसारवाडीत दोन दिवसातून एकदा पाण्याचा टँकर सुरू असून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

- दिगंबर भालचिम, माजी सरपंच, माळीण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.