मोठी बातमी! गर्भवतींना तपासणी किंवा प्रसुतीवेळी द्यावा लागणार आता वयाचा पुरावा; ...अन्यथा मुलीच्या सासर-माहेरच्यांसह डॉक्टरांवरही दाखल होईल गुन्हा, वाचा...
esakal May 01, 2026 03:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील रुग्णालयांमध्ये एक-दीड वर्षापूर्वी प्रसूती झालेल्या तब्बल ३५ बालमाता आता उजेडात आल्या. हा विषय राज्य बाल हक्क आयोगाने गांभीर्याने घेतला आहे. दुसरीकडे शहर पोलिसांनीही थेट बालमातेच्या पतीविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत तर तिच्या माहेर-सासरच्यांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ज्या रुग्णालयांनी माहिती लपविली तेथील तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालये खबरदारी घेत आहेत. आता प्रसूतिपूर्व तपासणीसाठी आलेल्या गर्भवतींकडून रुग्णालये वयाचा पुरावा घेत आहेत.

मागच्या आठवड्यात सोलापूर शहरातील एका रुग्णालयात मोहोळ तालुक्यातील एक मुलगी प्रसूतीसाठी आली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या जन्माचा पुरावा मागितला. त्यावेळी त्या मुलीचे वय १७ वर्षे असल्याची बाब समोर आली. त्या रुग्णाालय प्रशासनाने याची माहिती जोडभावी पेठ पोलिसांना कळविली. पोलिसांनी कागदपत्रे तपासून मोहोळ पोलिसांकडे हे प्रकरण पाठविले आहे.

आठ दिवसांतून असे एक-दोन प्रकार रुग्णालयांकडून पोलिसांना कळविले जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. बालमातांचा प्रकार समोर आल्यावर शहरातील अनेक दवाखान्यातील तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असल्याने दवाखाने आता प्रसुतीसाठी किंवा तपासणीसाठी आलेल्या मुलीचा जन्माचा पुरावा मागत असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

...अन्यथा डॉक्टरांवरही दाखल होईल गुन्हा

बालविवाह प्रतिबंधक कायदा- २००६ नुसार मुलगी १८ आणि मुलगा २१ वर्षांखालील असल्यास तो बालविवाह मानला जातो. बालविवाह करणे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. कायद्याअंतर्गत विवाह घडवून आणणाऱ्यांना २ वर्षांपर्यंत सक्तमजुरी व १ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. दुसरीकडे अल्पवयीन मुलगी ज्या दवाखान्यात प्रसूतिपूर्व तपासणीसाठी किंवा प्रसुतीसाठी येते, त्याची माहिती रुग्णालयांनी तातडीने स्थानिक पोलिसांना कळविणे बंधनकारक आहे, अन्यथा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल होतो.

- प्रताप पोमण, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

एकाही प्रसूत महिलेचा रुग्णालयांकडे नाही जन्माचा पुरावा

सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये महिलांची प्रसूतिपूर्व तपासणी व प्रसूतीची सोय नाही. त्यामुळे गर्भवती तपासणी व प्रसुतीसाठी तालुक्यातील किंवा शहरातील रुग्णालयात येतात. त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तोंडी वय नोंदवून त्यांची तपासणी किंवा प्रसूती केली जाते, असे प्रकार बालमातांच्या माध्यमातून समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी डॉक्टरांची आठ पथके नेमून शहरातील प्रत्येक महिला रुग्णालयातील प्रसूतीच्या नोंदी तपासणीचे आदेश दिले. त्यावेळी प्रसूतिपूर्व तपासणीसाठी किंवा प्रसुतीसाठी आलेल्या एकाही मुलीच्या जन्माचा दाखला रुग्णालयांनी घेतलेला नाही. नातेवाइकांच्या सांगण्यावरून अंदाजे वय नोंदविल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे त्यातील किती मुली अल्पवयीन आहेत हे समजत नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.