Shikrapur News : बैलगाडा शर्यतीवेळी बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
esakal May 01, 2026 03:45 AM

शिक्रापूर - करंदी (ता. शिरूर) येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीवेळी बैल पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाला. प्रकाश महादू फटांगडे (वय ३५, रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर), असे त्याचे नाव आहे.

करंदी येथे ‘करंदी केसरी २०२६’ या नावाने बैलगाडा शर्यतीचे गुरुवारी (ता. ३०) आयोजन केले होते. शर्यत सुरू असताना कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा अनियंत्रित झाला. धावणारे बैल पकडण्यासाठी प्रकाश फटांगडे हे पुढे सरसावले. त्यावेळी बैलाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन ते जमिनीवर कोसळले.

उपस्थितांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत त्यांचा भाऊ गोरक्ष महादू फटांगडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

गावात यात्रा नसताना केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी शर्यत भरवल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. ‘स्पर्धेच्या ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक किंवा पोलिस बंदोबस्त नव्हता. त्यामुळेच प्रकाशचा जीव गेला,’ असा संताप कुटुंबीयांनी व्यक्त केला. याबाबत संपूर्ण चौकशी करून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेणार असल्याचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.