राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या लिंगपिसराट अशोक खरात फसवणूक आणि खंडणी प्रकरणात आज न्यायालयात सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. तपास अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, कशा प्रकारे ‘अवतार पूजे’च्या नावाखाली फसवणूक करण्यात आली, याचा धक्कादायक तपशील सादर केला.
काळी जादू आणि मृत्यूची भीती
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, फिर्यादीला आपला लॉजिस्टिक व्यवसाय जगभरात विस्तारण्याची इच्छा होती. याचाच गैरफायदा घेत आरोपी खरातने ‘अवतार पूजा’ करण्याचे आमिष दाखवले. ईशान्येश्वर मंदिर परिसरात फिर्यादीला बोलावून एक नकली साप दाखवण्यात आला. ही पूजा पूर्ण करण्यासाठी 21 देशांत जावे लागेल, अन्यथा नाग दंश करेल आणि तुमचा मृत्यू होईल, अशी भीती फिर्यादीला घालण्यात आली. आरोपीने फिर्यादीकडून तब्बल १ कोटी ११ लाख रुपये बँक खात्यावर घेतले. तसेच, तुर्कस्थानमधून फर्निचर आणल्यास पूजा यशस्वी होईल असे सांगून खर्च करायला लावला आणि फिर्यादीची मर्सिडीज कार देखील स्वतःकडे घेतली.”परिस शक्ती” प्राप्त झाल्यावर व्यवसायात मोठी भरभराट होईल, असे सांगून ही फसवणूक आणि खंडणी वसूल करण्यात आली आहे.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?
सरकारी वकिलांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करताना सांगितले की, ही केवळ आर्थिक फसवणूक नसून जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण देखील करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी SIT (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली असून, आरोपीची पुन्हा पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोपीच्या वकिलांचा बचाव
आरोपीच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी खरात यांच्याकडे कामाला असलेल्या नीरज जाधव नावाच्या व्यक्तीने ‘स्पाय कॅम’ बसवून अश्लील व्हिडीओ चित्रीत केले होते आणि ते व्हिडीओ जासूद व परब यांना पुरवल्याचा दावा वकिलांनी केला. तसेच फिर्यादीने जे काही दिले आहे, ते स्वेच्छेने दिलेले ‘गिफ्ट’ असून ३ देशांमध्ये फिरण्यासाठी जो खर्च झाला, त्याची माहिती आधीच देण्यात आली आहे.
तपास अधिकाऱ्यांचे प्रत्युत्तर
तपासी अधिकाऱ्यांनी आरोपीच्या वकिलांचे दावे खोडून काढताना सांगितले की, जासूदवर करण्यात आलेल्या आरोपांचा कोणताही पुरावा सध्या समोर आलेला नाही. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एकाच दिशेने सुरू असून आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानंतर खरातला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवव्या गुन्ह्यात ४ मे पर्यंत खरातचा मुक्काम SIT च्या कोठडीत आहे.