उन्हाळ्यात गरमीमुळे शरीरावर अनेक परिणाम होतात. विशेषतः काही लोकांना नाकातून अचानक रक्तस्त्राव होण्याचा त्रास सह करावा लागतो. याला सामान्यतः नाकातून रक्तस्त्राव (नॅसोऱ्होइया) म्हणतात. (Image Credit Source: Social Media)
ही समस्या लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये अधिक प्रमाणात आढळते, परंतु कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो. पण हे सामान्य आहे, असं समजून लोकं अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र हा त्रास वारंवार उद्भवणे हे आरोग्यासाठी धोक्याचे लक्षण असू शकते.
उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये हवा कोरडी होते, ज्यामुळे नाकाच्या आतील नाजूक त्वचा कोरडी पडते. जेव्हा ही त्वचा कमकुवत होते, तेव्हा त्यातील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो. शरीरातील पाण्याची कमतरता, म्हणजेच निर्जलीकरण, हे देखील याचे एक प्रमुख कारण आहे. याव्यतिरिक्त, वारंवार नाक खाजवणे, जोरात साफसफाई करणे, दुखापत किंवा ॲलर्जी यांसारख्या समस्यांमुळे देखील ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
यापासून संरक्षण हवं असेल तर शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. दिवसभरात पुरेसं पाणी पिणं, तसेच लिंबू पाणी आणि ताक यांसारख्या पेयांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कडक उन्हात बाहेर जाणं टाळा आणि बाहेर जाताना डोकं, कपाळ नीट झाका. घरातील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापरही करता येऊ शकतो.
जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर घाबरू नका. सरळ बसा, तुमचे डोकं थोडं पुढे झुकवा आणि नाकावर हळूवारपणे दाब द्या. तुमच्या अंगठ्याने आणि बोटाने नाकाच्या मऊ भागावर 5-10 मिनिटे हळूवारपणे दाब द्या, तोंडाने श्वास घ्या आणि नाकाला आराम द्या. तुम्ही तुमच्या नाकावर आणि कपाळावर थंड पट्टी (बर्फ/थंड कापड) ठेवू शकता. रक्तस्त्राव थांबेपर्यंत झोपणे टाळा.
जर रक्तस्त्राव जास्त होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि कान-नाक-घसा तज्ञाचा सल्ला घ्यावा. योग्य माहिती आणि वेळेवर उपाययोजना केल्यास, नाकातून रक्त येण्यासारख्या समस्येवर सहज नियंत्रण मिळवता येते आणि गंभीर परिस्थिती टाळता येते.
योग्य काळजी घेतल्यास आणि वेळेवर उपाययोजना केल्यास उन्हाळ्यातील नाक फुटण्याची, रक्त येण्याची समस्या सहजपणे नियंत्रणात आणता येते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)