IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?
esakal May 02, 2026 03:45 AM

Delhi Capitals emotional tribute after tragic fan death : दिल्ली कॅपिटल्सने सलग ३ सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडित करत ७ गडी राखून राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. RR ला आपल्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सलग दुसऱ्या सामन्यातही २२५ किंवा त्याहून अधिक धावांचा बचाव करण्यात अपयश आले. अक्षर पटेलने सामन्यानंतर हा विजय १४ वर्षीय अभव व २० वर्षीय यज्ञ यांना समर्पित केला. या दोघांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीचे खेळाडू दंडावर काळी फित बांधून खेळले.

दिल्लीचा हा आयपीएल इतिहासातील त्यांनी केलेला सर्वाधिक मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला. मागील सामन्यात अवघ्या ७५ धावांत खुर्दा उडाला होता आणि ज्यांनी आपल्या इतिहासात कधीही २२०-हून अधिक धावांचा पाठलाग यशस्वीपणे केला नव्हता, पण आज त्यांनी ४ चेंडू राखून आणि हातात ७ गडी असताना हे लक्ष्य गाठले.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

पथूम निसंकाने पॉवरप्लेमध्ये संघाला अगदी योग्य सुरुवात करून दिली, ज्यामुळे कॅपिटल्सने वेगाने ७० धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर लोकेश राहुलने सूत्रे हाती घेतली आणि या जोडीने मिळून ११० धावांची एक वेगवान सलामीची भागीदारी रचली. निस्संकाच्या ( ४७) बाद झाल्यानंतर, नितीश राणाने ( ३३) विजयाची गती कायम राखली आणि राहुलसोबत आणखी ६१ धावांची भागीदारी केली.

हे दोघे सहजपणे संघाला विजयापर्यंत नेतील असे वाटत होते; परंतु सलगच्या षटकांमध्ये गडी बाद झाल्यामुळे राजस्थानचा संघ काही काळासाठी पुन्हा सामन्यात परतला. मात्र, आशुतोष शर्मा ( नाबाद २५) आणि त्रिस्तान स्तब्स ( नाबाद १८) यांनी आपला संयम ढळू दिला नाही आणि कॅपिटल्सला विजयापर्यंत पोहोचवले.

अक्षर पटेल काय म्हणाला?

अक्षर पटेल म्हणाला की,"मागच्या मुलाखतीतही मी हेच सांगत आलो आहे की, तुम्ही योग्य गोष्टी करत राहायला हवं. मुलं ज्या प्रकारे खेळली, त्याचा मला आनंद आहे. आम्ही आमच्या योजनांची अंमलबजावणी केली आणि एक कर्णधार म्हणून मी यापेक्षा जास्त आनंदी असू शकत नाही. पॉवरप्लेमध्ये तुम्ही त्यांच्याकडून सामना हिसकावून घेता, तेव्हा मला आनंद होतो. मिचेल स्टार्क एक महान खेळाडू आहे, तीन महिन्यांनंतर तो खेळत आहे आणि अशी कामगिरी करणे, हे दाखवते की तो इतका महान खेळाडू का आहे."

कोण होते अभव व यज्ञ?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यानंतर दिल्लीच्या अशोक रोडवर भयंकर अपघात झाला. रात्री झालेल्या अपघातात १४ वर्षीय अभव याच्यासह २० वर्षीय यज्ञ भाटिया यांचे निधन झाले. हे DC Toli चे सदस्य होते आणि नेहमीप्रमाणे आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टँडमध्ये उपस्थित असायचे. मात्र, दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अक्षरने “हा विजय दिल्लीच्या चाहत्यांसाठी आहे” असे म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.