शेजारील राज्यात 44 मोरांच्या मृत्यूने खळबळ, H5N1 ला दुजोरा,10 किमी क्षेत्रात कंटेनमेंट झोन
Tv9 Marathi May 02, 2026 03:45 AM

एकीकडे बर्ड फ्लूने नंदूरबार येथे कोंबड्यांचा मृ्त्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात असताना आपल्या शेजारील कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यात ४४ मोरांचा मृत्यूने खळबळ उडाली आहे. या मोरांचाही मृत्यू H5N1 बर्ड फ्लूने झाल्याचे म्हटले जात आहे. १६ एप्रिल पासून येथे मोरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यानंतर अखेर रिपोर्ट आल्याने या मोरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. मोरांच्या मृत्यूमुळे प्रशासनाने १० किलोमीटरचा भाग कण्टोनमेंट झोन घोषीत केला आहे. आरोग्य आणि वन विभागाने या प्रकरणात एकत्र कारवाई सुरु केली आहे.

कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यात १६ एप्रिलपासून मोरांचे मृत्यू होत होते. शेतामध्ये मरुन पडलेले मोर सापडत होते. या मोरांचा तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांच्यात H5N1 बर्ड फ्लू व्हायरस सापडला आहे. त्यामुळे आता एक आठवड्यात ४४ हून अधिक मोरांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मोरांचे हे मृत्यू केसारामाडु, हीरेहली आणि गुलूर ग्राम पंचायतीच्या क्षेत्रात झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या भागातील १० किलोमीटरचा परीसर सरकारने कण्टोनमेंट झोन घोषीत केला आहे.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मृत मोरांचे नमूने भोपाळ येथील आयसीएआर-नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हाय सिक्युरिटी एनिमल डिसीस येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यानंतर आलेल्या अहवालात या मोरांचा मृत्यू H5N1 बर्ड फ्लूने झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, २३ एप्रिलपासून नव्या मृत्यूची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

H5N1 बर्ड फ्लू व्हायरस मृ्त्यूचे कारण

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) कुमार पुष्कर यांनी सांगितले की वन विभाग आणि आरोग्य विभाग तसेच पशुपालन विभागाने एकत्र येत हे संक्रमण नियंत्रित करण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. सुरक्षेचा भाग म्हणून १० किमीचे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.

रुग्णालयांना सज्जतेचे आदेश

या क्षेत्रातीस सर्व पोल्ट्री फार्मना अलर्ट करण्यात आले आहे. आणि दिशा-निर्देशानुसार काळजी घेतली जात आहे. हॉस्पिटलना देखील या प्रकरणात कळवण्यात आले आहे. तसेच पीपीई किट, मास्क, औषधे आणि तपासणी किटचा स्टॉक सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासन सध्या सर्व परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. संक्रमण रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.