Maharashtra News Live Update : बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार
Sarkarnama May 02, 2026 11:45 AM
Buldhana News : बुलढाण्यातली 729 गावे टंचाईग्रस्त घोषित; 18 गावात टँकर मंजूर, तर 59 गावात विहिरी अधिग्रहीत

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील 729 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून 18 गावात टँकर मंजूर, तर 59 गावात विहिरी अधिग्रहीत करण्यात आली आहेत. जिल्ह्याचा जून पर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Ahilyanagar Crime : मुलाने केली बापाची हत्या, कौटुंबिक वादाची किनार

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून मुलाने बापाची हत्या केली. रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मुलाने बापावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 65 वर्षीय मुसा हसन बागवान यांचा मृत्यू झाला. मुलगा आशपाक बागवान (वय 30) याला पोलिसांनी अटक केली आहे.

HSC Result 2026 : बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज 2 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे. परीक्षेसाठी 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 7 लाख 99 हजार 773 विद्यार्थी विज्ञान शाखेचे, 3 लाख 80 हजार 692 कला शाखेचे तर 3 लाख 20 हजार 152 विद्यार्थी वाणिज्य शाखेचे होते. शिवाय 27 हजार 378 विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तर 4 हजार 492 विद्यार्थी आयटीआय शाखेचे होते. बारावीची ही परीक्षा एकूण 9 विभागांमध्ये घेण्यात आली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.