Nandurbar Accident News : नंदुरबार जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मनाचा थरकाप उडवणारा अपघात (Accident News) घडला आहे. नवापूर तालुक्यातील सावरट जवळ अत्यंत हृदयद्रावक असा अपघात झाला आहे. विसरवाडी-नवापूर राष्ट्रीय महामार्ग 53 वर सावरट गावाजवळ रिक्षा आणि अज्ञात वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात विसरवाडी येथील संगीता भिल नावाच्या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या भीषण अपघातात रिक्षाचालकासह 7 ते 8 महिला आणि 2 लहान मुले गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या भीषण अपघातानंतर भर उन्हात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ महिलांनी एकच आक्रोश केला आहे. आपल्या मांडीवर मृतदेह ठेवत हतबल झालेल्या महिलेचा हा व्हिडिओ मनाला चटका लावणारा असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शासकीय योजनेचे साहित्य मिळवण्याच्या आशेने घराबाहेर पडलेल्या महिलांवर काळाने झडप घातली आहे. विसरवाडी-नवापूर राष्ट्रीय महामार्ग 53 वर सावरट गावाजवळ रिक्षा आणि अज्ञात वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
Nandurbar Accident News : रिक्षाचालक गंभीर, धडक देणारा अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक राकेश बिऱ्हाडे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या दोन महिलांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात, तर दोन लहान मुलांना गुजरातच्या व्यारा येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर दुसरीकडे धडक देणारा अज्ञात वाहनचालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेताय.
Shrivardhan Accident News : पिकअप आणि ट्रेलरचा अपघात; एकाचा चिरडून मृत्यू तर 8 मजूर जखमी
असाच एक अपघात श्रीवर्धन म्हसळा रोडवर झाला असून पिकअप आणि ट्रेलरचा आपसात भिडले आहे. आंबा तोडणीसाठी निघालेल्या पिकअप टेम्पोवर धडक दिल्याने श्रीवर्धनच्या दिशेकडे जाणारा ट्रेलर मेघरे गावाजवळ पलटलाय. या अपघातात एकाचा चिरडून मृत्यू झाला आहे. तर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाहेर काढण्याच काम युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातात 8 मजूर जखमी झाल्याची माहिती असून जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालय आणि श्रीवर्धन रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या