खरातशी जवळीक भोवली, चाकणकरांची बहीण गोत्यात, किती कोटींचे व्यवहार? धक्कादायक आकडा; ईडी सगळंच उकरून काढणार?
Tv9 Marathi May 02, 2026 06:45 PM

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले असून, पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच अशोक खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यामध्ये किती कोटींचा व्यवहार झाला हे देखील समोर आले आहे.

नेमके प्रकरण काय?

भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर महिला अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. खरात याच्या मंदिराच्या ट्रस्टवर रूपाली चाकणकर सदस्य होत्या, ज्यामुळे त्यांच्यावर आधीपासूनच टीकेची झोड उठली होती. तीव्र विरोधानंतर चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून त्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव समोर आले आहे.

तपासातील धक्कादायक खुलासे:

संशयास्पद कॉल रेकॉर्ड: तपासादरम्यान समोर आले आहे की, अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्यात ३३ हजार सेकंदांहून अधिक काळ संभाषण झाले आहे. तसेच, त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि खरात यांच्यात सुमारे २३६ वेळा फोनवरून संपर्क झाला होता.

आर्थिक व्यवहार: रूपाली चाकणकर यांनी खरातशी कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचा दावा केला होता. मात्र, ज्या पतसंस्थेतून खरातने व्यवहार केले, त्याच ‘समता पतसंस्थेत’ प्रतिभा चाकणकर यांचे खाते असल्याचे आढळले आहे.

कोट्यवधींची उलाढाल: प्रतिभा चाकणकर यांच्या नावे असलेल्या खात्यातून ४० ते ५० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त करण्यात आला आहे.

अशोक खरातने अनेक व्यक्तींच्या कागदपत्रांचा (उदा. पॅन कार्ड) वापर करून विविध पतसंस्थांमध्ये शेकडो खाती उघडली होती, ज्यामध्ये तो स्वतः ‘नॉमिनी’ होता. प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या खात्यातील सुमारे ३ कोटी रुपयांच्या संशयास्पद उलाढालीबाबत ‘ईडी’ आता सखोल चौकशी करणार आहे.

चाकणकर कुटुंबावर दबाव वाढला

सुरुवातीला या प्रकरणाशी संबंध नाकारणाऱ्या चाकणकर कुटुंबासाठी ‘ईडी’ची ही नोटीस मोठा धक्का मानली जात आहे. खरातची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि चाकणकर भगिनींशी असलेले त्याचे आर्थिक धागेदोरे यामुळे या चौकशीत कोणते नवीन खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.