Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना (Solapur Crime) घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी (Boramani) गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आई, मुलगी आणि मुलाची एकाच वेळी हत्या झाल्याने संपूर्ण सोलापुरात खळबळ उडाली आहे. गायत्री सुधाकर मस्के वय 40, मुलगी प्रिया मस्के वय 18 आणि मुलगा शिवराज मस्के वय 16 असे हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आी आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आई आणि दोन मुलांवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह घराच्या गच्चीवर तर शिवराज याचा मृतदेह हा बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांकडून या घटनेच्या संदर्भाने तातडीने तपास सुरु करण्यात आलं असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Bhor Crime News) करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल घडली आहे. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. चाकणच्या म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षाच्या अल्पवयीन चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं सर्वत्र संतप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा बिहार राज्यातील असलेल्या एका सोळा वर्षे अल्पवयीन तरुणाने हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेश मधील असून कामनिमित्तानं चाकण परिसरात वास्तव्यास होते. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.