मुंबई लोकल रेल्वे स्थानकाच्या बांधकामात १४९ घरांचा अडथळा, कुटुंबांना रेल्वेकडून नोटीस; बेघर होण्याची शक्यता
esakal May 02, 2026 09:45 PM

ठाणे : ठाणे-मुलुंडदरम्यान होणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी नौपाड्यातील बांदल चाळ परिसरातील तब्बल १४९ घरांचा अडथळा आला आहे. या घरांना रेल्वे प्रशासनाने पाडकामाच्या नोटिसा बजावल्याने येथील कुटुंबांवर बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे पाच दशकांपासून वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, सुनावणीसाठी ७ मेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

ठाणेरेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम आता तातडीने पूर्ण करण्याची मोहीम रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे; मात्र आता या विस्तारित रेल्वे स्थानकामुळे दीडशे घरे बाधित होणार आहेत. नौपाडा येथील रेल्वेमार्गालगत वसलेल्या बांदल चाळीत चार ते पाच पिढ्यांपासून कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रस्तावित स्थानक प्रकल्पासाठी या जागेची आवश्यकता असल्याने मध्य रेल्वेच्या मालमत्ता विभागाने रहिवाशांना नोटिसा दिल्या आहेत.

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

या प्रकल्पामध्ये स्थानकासाठी जोडरस्ते व इतर पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी पालिकेने स्वीकारली आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित आणि पात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुनर्वसनाची मागणी

बाधित कुटुंबांना पर्यायी घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी नगरसेवक संजय वाघुले यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनाही पत्र पाठवून रहिवाशांना न्याय देण्याची विनंती केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.