Parbhani News: गंगाखेडमध्ये उकाडा आणि वीजपुरवठा अनियमित; नागरिक त्रस्तलपंडावामुळे शेतकरी, व्यापारी आणि घरगुती कामकाज विस्कळीत
esakal May 03, 2026 02:45 PM

गंगाखेड : जिल्ह्याचा पारा ४४ अंशावर गेला असतानाच मूलभूत सुविधांपैकी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने नागरिकांना उकाडा असह्य झाला आहे. विजेच्या लपंडावामुळे नागरिक, शेतकरी, मध्यम-लघु व्यावसायिक, उद्योजक, विविध शासकीय कार्यालये, बॅंका, विविध क्लासेसमधील कामकाज विस्कळित झाले. याकडे ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन वीजपुरवठ्यात तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

गंगाखेडमध्ये नागरिक हैराण

मागील एक महिन्यापासून शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे अगोदरच हैराण झालेल्या नागरिकांना ‘महावितरण’च्या ढिसाळ कारभारामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: दंड नव्हे, नियोजित पार्किंगची गरज; फुलंब्रीतील जळगाव महामार्गालगत मार्किंगची आवश्यकता

गंगाखेड शहर आणि परिसरात दिवसभरात अनेकवेळा वीज येत-जात असल्याने घरगुती, व्यावसायिक, शैक्षणिक कामांवर मोठा परिणाम होत आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

रात्री वारंवार वीज खंडित होत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळित झाले. शहरातील व्यापाऱ्यांनाही या समस्येचा फटका बसत आहे. विजेअभावी दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि लघुउद्योगांचे कामकाज ठप्प होत आहे. संगणकाधारित व्यवहार, ऑनलाइन सेवा, इतर व्यावसायिकांना फटका बसत आहे. वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Premium|Maratha Military Tactics : अफजलवधानंतर शिवरायांची मोठी आक्रमणे; १५ हजार चौरस किमी प्रदेशावर भगवा फडकावल्याची शौर्यगाथा

"विजेचा लोड वाढल्याने लोड डिस्पॅच सेंटरकडून लोडशेडिंगच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या वेळेनुसार लोडशेडिंग करत आहोत."

— अरुण गुहे,

सहायक अभियंता, महावितरण

"वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने माझ्या ऑनलाइन व्यवसायावर परिणाम झाला आहे. उन्हाळ्यामुळे लहान मुले, वयस्कर नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. यामुळे वीजपुरवठा सुरळीत करावा. "

— धनराज फड,

नागरिक, गंगाखेड.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.