माणुसकी हरपली! सोलापुरात प्रॉपर्टीच्या वादातून काकानेच केला १५ वर्षीय पुतण्या, १७ वर्षीय पुतणी, विधवा वहिनीचा खून; ५ अटकेत, पण मुख्य सूत्रधार फरारच
esakal May 04, 2026 03:45 AM

सोलापूर : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील विधवा वहिनीसह पुतण्या व पुतणीचा निर्घृण खून करणारा काका म्हणजेच शंकर ऊर्फ पप्पू दत्तात्रय मस्के हा फरार झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात पाच संशयितांना जेरबंद केले आहे. त्यात शंकर मस्के याचा मुलगा, मुलगी, पत्नी व मेव्हणा आणि शंकरच्या हॉटेलमधील मॅनेजर आहे.

संशयित आरोपी शंकर मस्के याने शुक्रवारी (ता. १) वहिनी व तिच्या दोन्ही मुलांना संपविण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने पत्नी व मुलांना परगावी पाठविले होते. शंकरची आई देखील नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी परगावीच होती. या कटात त्याला मुलगा धीरज व त्याच्या हॉटेलमधील कामगार सचिन शिवाजी वाघमारे यांनी साथ दिली. शंकर काय करणार आहे, याची माहिती त्याची पत्नी राणी व मुलगी दिक्षा यांना होती, असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. मृत गायत्री सुधाकर मस्के यांचा भाऊ दिलीप विश्वनाथ चांदोरे (रा. चंडकापूर, ता. बसवकल्याण) यांनी सोलापूर तालुका पोलिसांत फिर्याद दिली.

तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत. संशयित आरोपींच्या शोधासाठी सोलापूर तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची सहा पथके रवाना झाली होती. २० तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी पाच संशयितांना पकडले. पण, मुख्य संशयित आरोपी शंकर मस्के अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. कोट्यवधींच्या जमिनीची वाटणी द्यायची नाही आणि वहिनीने दिलेले हातउसने २५ लाख रुपये द्यायचे नाही म्हणूनच शंकरने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

एकराचा भाव ८५ लाख रुपये अन्...

बोरामणी येथील दत्तात्रय मस्के यांना शंकर, प्रदीप व सुधाकर अशी तीन मुले. यातील प्रदीप व सुधीर यांचे निधन झाले आहे. बोरामणी भागात महामार्गालगतच्या जमिनीचा दर एकरी ८५ लाख रुपये आहे. मस्के कुटुंबीयांची सात एकर जमीन असून घरासमोरील जमीन लहान मृत भाऊ सुधाकर यांच्या हिश्शाला येत होती. दोन्ही भावाच्या मृत्यूनंतर त्यांच्या हिश्शाच्या जमिनीवर मोठा भाऊ शंकरचा डोळा होता. पण, वहिनी सतत जमिनीच्या वाटणीसाठी वाद घालत होती. त्यातून शंकरने २ मेच्या मध्यरात्री झोपेत असतानाच वहिनीसह तिच्या दोन्ही मुलांना संपविल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिवराजच्या अंगावर चार ते पाच वार

आई गायत्रीच्या मानेवर काका शंकरने तलवारीचा एक घाव घातला आणि त्यात ती जागीच ठार झाली. काका मारायला आल्याचे पाहून पुतण्या शिवराजने त्याला प्रतिकार केला, पण शंकरने त्याच्या डोक्यात व हातावर वार केले. त्यानंतर शंकर तलवार घेऊन पुतणीकडे निघाला. त्यावेळी शिवराजने पुन्हा त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने दोन वार करून प्रियाला संपवले. जिवाच्या भीतीने शिवराज जखमी अवस्थेत खाली घरात आला. मात्र, त्यालाही गाठून पुन्हा वार करून संपवले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.