IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?
esakal May 04, 2026 03:45 AM

IPL 2026 Points Table Update: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (३ मे) दोन सामने झाले. यातील दुसऱ्या सामन्यात अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सविरुद्ध शेवटच्या षटकात थरारक विजय मिळवला. गुजरातने १ चेंडू राखून ४ विकेट्सने विजय मिळवला.

गुजरातच्या (Gujarat Titans) विजयात साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर (Sai Sudharsan - Washington Sundar) यांनी मोलाचा वाटा उचलला. गुजरातने या विजयासह या हंगामातील पंजाबच्या (Punjab Kings) घरच्या मैदानात झालेल्या पराभवाचा वचपाही काढला.

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI पाँइंट्स टेबलमध्ये काय झाले बदल?

पंजाब किंग्सने गुजरातसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग गुजरातने १९.५ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केला. हा गुजरातचा १० सामन्यांतील ६ वा विजय होता. त्यामुळे त्यांचे आता १२ गुण झाले आहेत. त्यामुळे गुजरात ५ व्या स्थानावर कायम राहिले आहेत. पण त्यांची नजर आता पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यावर आहे.

कारण सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांचेही १२ गुण आहेत. पण या तिन्ही संघांपेक्षा गुजरातचा नेट रन रेट खराब आहे, त्यामुळे गुजरात पाचव्या क्रमांकावर आहेत.

तसेच पंजाबचा ९ सामन्यांतील हा दुसरा पराभव होता. दरम्यान, त्यांचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या ७ सामन्यांत त्यांनी एकही पराभव पाहिला नव्हता. पण त्यामुळे ते या पराभवानंतरही पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रविवारी पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सने ७ विकेट्सने पराभूत केले होते. त्या सामन्यानंतरही हैदराबाद १० सामन्यांनंतर ६ विजय आणि चौथ्या पराभवासह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचेही १२ गुण आहेत. कोलकाताचा हा तिसरा विजय होता. त्यामुळे ते ७ गुणांसह ८ व्या क्रमांकावर आहेत.

सुदर्शनचं अर्धशतक अन् वॉशिंग्टन सुंगरची फिनिश

गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी धावांचा पाठलाग करताना डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात दोघांनी आक्रमक सुरुवात केली. पण दुसऱ्याच षटकात अर्शदीप कोनोलीने कर्णधार शुभमन गिलला ५ धावांवर माघारी धाडले. त्याचा झेल कुपर कोनोलीने घेतला.

पण नंतर साई सुदर्शनला जॉस बटलरची साथ मिळाली. गोलंदाजांना साथ मिळत असल्याने त्यांनी संयमी खेळ करताना ४० चेंडूत ५३ धावांची भागीदारीही केली. पण ९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॉस बटलरला विजयकुमार वैशाखने २६ धावांवर बाद केले. त्याचा झेल श्रेयस अय्यरने घेतला.

तरी नंतरही सुदर्शन निशांत सिंधूला साथीला घेत डाव पुढे नेत होता. परंतु १२ व्या षटकात सिंधूही १५ धावांवर बाद झाला. त्याला मार्कस स्टॉयनिसने विजय कुमार वैशाखच्या हातून झेलबाद केले.

पण त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरसह फलंदाजी करताना सुदर्शनने काही आक्रमक शॉट्स खेळले. पण तो अर्धशतक केल्यानंतर १५ व्या षटकात विजयकुमार वैशाखच्या गोलंदाजीवर झेव्हियर बार्टलेटकडे झेलबाद देत बाद झाला. त्याने ४१ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ५७ धावा केल्या. राहुल तेवतियाही २ धावांवर माघारी परतला.

त्यानंतर मात्र पंजाबच्या गोलंदाजांना पुनरागमनासाठी संधी मिळाली होती, तरी एका बाजूने वॉशिंग्टन सुंदर लढत होता. त्याचदरम्यान १९ व्या षटकात जेसन होल्डरही ५ धावांवर बाद झाला. त्यामुळे शेवटच्या षटकात गुजरातसमोर ११ धावांचे समीकरण होते.

पण मार्कस स्टॉयनिसने गोलंदाजी केलेल्या या षटकात पहिला चेंडू वाईड झाला आणि नंतर अर्शद खानने चौकार मारला. पण नंतर स्टॉयनिसने पुनरागमन केले. २ चेंडूत ३ धावा असे नंतर समीकरण होते. त्यावेळी वॉशिंग्टन सुंदरने षटकार मारला आणि गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले? सुर्यांश शेडगे-मार्कस स्टॉयनिसच्या भागीदारीने पंजाबला सावरलं

तत्पुर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. गुजरातच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना फॉर्ममध्ये असलेल्या पंजाबला २० षटकात ९ बाद १६३ धावांवरच रोखले होते. पंजाबने ४७ धावांवरच ५ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर पंजाबकडून सुर्यांश शेडगेने २९ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. मार्कस स्टॉयनिसने ३१ चेंडूत ४० धावा केल्या. सुर्यांश आणि मार्कस यांच्यात ७९ धावांची भागीदारी झाली. या दोघांशिवाय केवळ मार्को यान्सिनने २० धावांचा टप्पा गाठला.

गुजरातकडून गोलंदाजी करताना जेसन होल्डरने ४ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. राशिद खानने १ विकेट घेतली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.