ममता दीदींचे भय, दहशत संपली, मोदीजींचा विश्वास जिंकला, पश्चिम बंगालच्या विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
अभिषेक मुठाळ May 04, 2026 08:43 PM

Eknath Shinde :  देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे. दरम्यान, भाजपला मिळालेल्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता दीदींचे भय, दहशत संपली असून, मोदीजींचा विश्वास जिंकल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.  

अमित भाई खरे चाणाक्य आहेत हे सिद्ध झालं

5 राज्यांपैकी 3 राज्यात भाजप एनडीए यांनी जिंकली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं. लोकांनी विश्वास दाखवला आहे. बंगालचा विजय ऐतिहासिक आहे, घवघवीत यश मिळालं आहे. पश्चिम बंगालमधील भय, दहशत आता संपल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ममता दीदींचे भय संपले, आणि मोदीजींचा विश्वास जिंकल्याचे ते म्हणाले. अमित शाह साहेब मागील 10 वर्षांपासून पक्ष वाढीचे काम करत होते. त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे.  अमित भाई खरे चाणाक्य आहेत हे सिद्ध झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म या राज्यात झाला. त्यांना ही श्रद्धांजली अर्पण केली आहे.  

बंगालमध्ये भाजपला मिळालेलं यश हे अतिशय दैदिप्यमान

पश्चिम बंगालमध्ये विकासनिधी घेण्याचे टाळले त्यामुळं विकास खुंटल्याचे एकनात शिंदे म्हणाले. बंगालमध्ये भाजपला मिळालेलं यश हे अतिशय दैदिप्यमान आहे. तिथे खालच्या पातळीवर जात टीका केली गेली. मात्र मोदीजींच्या पाठीमागे जनता उभी राहिली. मोदीजींवर आरोप केले मात्र आता ते विकासाच्या माध्यमातून उत्तर देतील असे एकनाथ शिंदे म्हणाले.  बंगाल विकासपासून वंचित राहिला आहे आता तो विकास होईल.  एसआयआरच्या माध्यमातून घुसखोर कमी झाली. एक प्रकारची आतंकवादी भूमिका आपण पाहिली. घटना घातक होत्या असे एकनाथ शिंदे म्हणाले.  

आसाममध्ये देखील हेमंत बिस्वा शर्मा यांनी योजना आखल्या आणि त्यांची पोचपावती त्यांना मिळाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आसाम का विजय आसान आहे असं ते म्हणायचे आणि तसंच झालं. रोहि्ंग्या बांगलादेशी यांना आता आळा बसेल. लोकांना विकास काय हे पाहायला मिळेल असे एकनाथ शिंदे म्हणाले.  

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.