मुंबई: देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यातील विधानसभा (Vidhansabha results) निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) पुन्हा एकदा मुसंडी मारली असून पश्चिम बंगालमध्येही भाजपचे कमळ खुलवण्यात पक्षाला यश आलं आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालकडे सर्वांचे लक्ष लागले होते, या निकालात भाजपने मोठी आघाडी घेतली असून सत्तास्थापनेसाठीचा बहुमताच आकडा पार केला आहे. दुसरीकडे राज्यातील दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. बारामतीत (Baramati) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मताधिक्याचा नवा विक्रम रचला असून आमदारकीसाठी तब्बल 2 लाख 18 हजार 806 मतं त्यांना मिळाली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. तर, येथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारास अवघे 932 मतं मिळाली आहेत.
बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि राहुरी मतदारसंघात अक्षय कर्डिले हे भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पोटनिवडणुकीच्या रिंगणात होते. बारामतीची पोटनिवडणूक अनेकांनी बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले, मात्र 23 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केल्यामुळे येथे निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्षांनी येथे उमेदवार दिला नसला तरी, स्थानिकांसह बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा-मुंडे यांनी उमेदवारी दाखल केल्याने त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, येथील निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा भरगोस मतांनी, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल, असा विश्वास राष्ट्रवादीसह महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, सुनेत्रा पवार यांनी रेकॉर्डब्रेक मत घेत विजय मिळवला.
सुनेत्रा पवार यांना 2 लाख 18 हजार 806 मतं मिळाली असून त्यांचे मताधिक्य सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे 2022 साली 2 लाख 14 हजार 835 मताधिक्याने विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला आहे, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे, बारामतीच्या पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर कोणता उमेदवार ठरला याची देखील उत्सुकता सर्वांना आहे. येथील निवडणुकीत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे आर.वाय. घुटुकडे हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले आहेत. घुटुकडे यांना केवळ 932 इतकी मतं मिळाली आहेत. यासह, येथील मतदारसंघात अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा यांच्या मतांची उत्सुकता महाराष्ट्राला लागली होती.
अभिजीत बिचुकले यांना बारामती विधानसभा निवडणुकीत अवघे 332 मतं मिळाली असून ते 5 व्या क्रमांकावर राहिले आहेत. तर, करुणा शर्मा यांना 300 मतं पडली असून त्या सहाव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांपेक्षा नोटाने अधिक मतं घेतली आहेत. नोटाला बारामती मतदारसंघात 729 मतं पडली आहेत. तर, अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोटे हे 40 मतांसह सर्वात कमी मत घेणारे उमेदवार ठरले आहेत.