आरोग्य'चेतना' : एका 'चित्रा'ची 'सर्जन'शील गोष्ट
esakal May 05, 2026 10:45 AM

डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन

मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे, जी आपल्या मनाच्या जिद्दीचे आणि सकारात्मकतेचे उत्तम उदाहरण आहे आणि अशा प्रकारची सकारात्मकता रुग्णांच्या मनात जागृत झाल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणूनच आज तुमच्या समोर मांडतो आहे.

या गोष्टीची सुरुवात एका चित्रापासून होते - एका अतिशय सुंदर आणि बोलक्या पेंटिंगपासून. या पेंटिंगची कलाकार स्वतः एक डॉक्टर आहे - खरं तर एक तरुण आणि तडफदार सहकारी. काही महिन्यांपूर्वी तिला तिच्या दृष्टीच्या क्षमतेत बदल जाणवू लागला. त्याचबरोबर एक प्रकारची डोकेदुखी सुरू झाली. थोड्या प्राथमिक तपासण्या झाल्यावर निदान निश्चित होईना म्हणून मेंदूचा MRI करण्यात आला. त्यात तिच्या मेंदूच्या उजव्या भागात एक मोठी गाठ असल्याचं दिसून आलं. मेंदूच्या अगदी तळाशी ही गाठ होती. या निदानानं तिचं आयुष्यच बदलून टाकलं. तिला मेंदूमध्ये एका मोठ्या गाठीचा, म्हणजेच ‘मेनिन्जिओमा’ जातीचा ट्युमर असल्याचं निष्पन्न झालं होतं. ही गाठ मेंदूच्या तळाशी अशा कठीण जागी होती, जिथून ती तिच्या दृष्टीच्या नसांवर दाब निर्माण करत होती. इतकंच नाही, तर आपलं वागणं आणि नियोजन नियंत्रित करणाऱ्या मेंदूचा भागाच्या ही गाठ अगदी जवळ होती.

ती पहिल्यांदा दाखवायला आली, तेव्हा ती साहजिकच हबकून गेली होती. तिचा MRI बघितल्यावर लक्षात आलं, की ही गाठ मोठी आणि अवघड ठिकाणी असली तरी त्वरित शस्त्रक्रिया केल्यास ती काढून टाकणं शक्य आहे.

मेंदूच्या गाठीचं निदान झाल्यावर रुग्णाची मानसिकता समजून घेऊन तिला धीर देण्याची आवश्यकता असते. आम्ही एकत्र बसलो, मी तिला उपचारांच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. ती एक डॉक्टर आहे; पण डॉक्टर नसती तरी माझा अनुभव असा आहे, की व्यवस्थित माहिती दिल्यास ती समजून घेण्याची क्षमता बहुसंख्य लोकांमध्ये असते. मी तिला विश्वास दिला, की या क्षेत्रातल्या शास्त्रीय प्रगतीच्या, तंत्रज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर ही गाठ सुरक्षितपणे काढणं शक्य आहे.

हे ऐकल्यावरसुद्धा तिचं धाडस वाखाणण्याजोगं होते. तिनं मनात शंकेची पाल न चुकता आणि वेळ वाया न घालवता तात्काळ शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिची शस्त्रक्रिया केली आणि ती गाठ मुळापासून काढून टाकली. शस्त्रक्रिया करताना हे स्पष्टं झालं, की ही गाठ खरंच कॅन्सरची नाही आहे.

तांत्रिकदृष्ट्या ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली होतीच; पण खरा चमत्कार तर त्यानंतर घडला आणि तोच महत्त्वाचा आहे.

शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच, काही दिवसांत तिनं हातात ब्रश धरला. मेंदूची एवढी मोठी शस्त्रक्रिया झालेली असतानाही, तिनं आपल्या भावनांना रंगांच्या माध्यमातून वाट करून दिली. तिनं हे पेंटिंग आम्हाला भेट दिलं, जे आजही आमच्या सेंटरमध्ये आशेचा किरण बनून उभं आहे. या चित्रात तिनं तिची गाठ नेमकी कुठं होती हे दाखवलंच; पण त्या अंधाऱ्या जागेचं रूपांतर प्रकाशात कसं झालं, याचा प्रवासही मांडला आहे. यात तिनं दाखवलेला हात न्युरोसर्जरीच्या शास्त्रांचं प्रतीक आहे. त्यासोबत एक शब्द लिहिला आहे जो तिच्या प्रवासाचं सार सांगतो : ‘क्युअर’ (Cure).

आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणते : ‘हे पेंटिंग माझ्या शस्त्रक्रियेचा आणि बरे होण्याचा प्रवास मांडते. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर मला मिळालेली माया, शास्त्रीय ज्ञानाने दिलेला आधार आणि माझा स्वतःचा ‘सावरायचे आहे’ यावर असलेला विश्वास याचे हे प्रतिबिंब आहे. मला असे वाटते, की शास्त्राच्याच हातांनी मला दुसरे आयुष्य दिले आहे. म्हणूनच मी या चित्राला नाव दिले आहे - ‘द गिफ्ट ऑफ हीलिंग’.’

न्युरोसर्जन म्हणून मला बऱ्याचदा असा अनुभव येतो, की रुग्ण गुगल किंवा एआयच्या माध्यमातून माहिती मिळवण्याच्या नादात खूप मौल्यवान वेळ गमावतात. या गोंधळात वेळ निघून जातो आणि गाठीचा दाब मेंदूच्या नाजूक पेशींवर वाढत राहतो. इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की मेंदूच्या पेशी एकदा नष्ट झाल्या, की त्या पुन्हा तयार होत नाहीत. या ‘डॉक्टर’ पेशंटच्या बाबतीत, तिनं घेतलेला त्वरित निर्णय तिच्या पथ्यावर पडला. त्यामुळे दृष्टी किंवा विचार करण्याच्या क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होण्याआधीच आम्ही उपचार करू शकलो.

आज ती केवळ ‘बरी’ झाली नाहीये, तर तिला तिचं आयुष्य परत मिळालं आहे. तिची कला, तिची स्वप्नं आणि तिचं भविष्य पुन्हा तिच्या हातात आलं आहे. ज्या कोणाला ब्रेन ट्युमरचं निदान झालं आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरावी. घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही, हा विश्वास जोपासण्याची गरज आहे. आजचं आधुनिक न्युरोसर्जिकल तंत्रज्ञान आणि कौशल्य बहुतांश सर्व प्रकारच्या गाठी यशस्वीपणे काढू शकते. निदान होणं म्हणजे शेवट नव्हे; तर या तरुण डॉक्टरनं सिद्ध केल्याप्रमाणे, शस्त्रक्रियेनंतर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व आणि चित्रकलेसारखी गुंतागुंतीची कौशल्यं पुन्हा मिळवू शकता.

एखादा रुग्ण अशा अनोख्या पद्धतीनं आपली कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आम्हा डॉक्टरांचं मन भरून येतं. एखाद्या रुग्णाला आपल्या छंदाकडे पुन्हा आनंदानं वळताना बघणं, हीच गोष्ट ‘ब्रेन ट्युमर सेंटर’मधील संपूर्ण टीमला अधिक जोमानं काम करण्याची प्रेरणा देते.

गुगल आणि एआय यावरची माहिती चुकीची असते असं नाही; पण ती सर्वसाधारण माहिती असते. विशिष्ट रुग्णाच्या विशिष्ट आजाराचे बारकावे त्यात नसतात. शस्त्रक्रियेतले धोके उधृत केले असले, तरी ती वेळेत केली नाही तर काय होईल याची सर्वांगीण चर्चा नसते हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.