ढिंग टांग : झालमुडी खॉबे...?
esakal May 05, 2026 10:45 AM

चटकमटक खाणार, त्याला देव देणार, असे कुणीतरी म्हटलेच आहे. चटकमटक पदार्थांना उत्तरेत का कुणास ठाऊक च्याट असे म्हणतात. आम्हाला ही संज्ञा आवडत नाही. च्याट काय च्याट? मराठीत च्याट घालून पाडतात. किंवा बशी, श्रीखंड वा रश्शाची वाटी, बूट किंवा तत्सम काही गोष्टी चाटतात. उदाहरणार्थ : बूटचाट्या...आता ही यादी बरीच वाढवता येईल. पण थोडक्यात आवरलेले बरे. मुद्दा येवढाच की आम्ही च्याट खात नाही, भेळपुरी वगैरे खातो. बंगाली भेळेला झालमुडी असे म्हणतात. बंगालीबाबूंचे सगळे वेगळेच असते. पाणीपुरीला पुचका असे म्हणतात. काहीही हं! आमच्या मराठीत फार्तर पचका होतो, तो खातबित नाहीत.

झालमुडी हा खाद्यपदार्थ हल्ली बराच लोकप्रिय झाला आहे. वंदनीय मोदीजी मध्यंतरी बंगालात गेले असता एका दुकानात त्यांनी दहा रुपयांची झालमुडी घेतली. झालमुडीदादांनी प्रेमाने त्यांना पुडी बांधून दिली. त्याचा मनःपूत आस्वाद मोदीजींनी घेतला. परिणाम? खेला होबे! खेला शेष!!

मोमतादिदींना ही दहा टाका मोजून घेतलेली झालमुडी महागात पडली. आज तुम्ही सारे बघताच आहात की मोदीजींनी अवघ्या दहा रुपयात संपूर्ण बंगाल नमोकुर्त्यांच्या खिश्यात टाकला. जे रोशोगुल्ला किंवा शाँदेश या मिठायांनी साधले नाही, ते दहा रुपयांच्या झालमुडीने झाले!!

झालमुडी घरात बनवून खाणे बावळट्टपणाचे आहे. हा पदार्थ रस्त्यातच उभ्याने खावा. मोदीजींनीही उभ्यानेच खाल्ला! मुंबई-पुण्यातले लोक भेळबिळ खातात. एसपीडीपी वगैरे चवीने हाणतात. आम्ही तर अनेक वर्षे एसपीडीपी हे पोलिस खात्यातील पद आहे, असे समजत होतो. शेवपुरी निघाली!! असो.

आज आम्ही झालमुडीबद्दल थोडेसे ज्ञान देणार आहो! झालमुडी स्वादिष्ट असते. चटपटीत असते. विशेषतः दुसऱ्याच्या पैश्याने खाल्ल्यास खूब भॉलो लागते. थोडे मापटेभर चिरमुरे घ्यावेत. ते गरम कुरकुरीत करून त्यात हा एवढासा चिरलेला कांदा, इतका इतकासा चिरलेला टमाटा, इवलीशी काकडी, कोथिंबीर, भाजके शेंगदाणे, शेवबिव घालून त्यावर मोहरीच्या तेलाची धार सोडावी. विषय एण्ड!!

सरसोंच्या तेलाचा स्वाद बंगाली भेळेला झालमुडीचा झणका बहाल करतो. मोदीजींनी एका दुकानातून झालमुडी खरेदी कशी केली, तिथे तेवीस क्यामेरे कसे बसवले होते, झालमुडीदादा प्रत्यक्षात सुरक्षा कर्मचारीच कसा होता, आदी बराच खल करून झाल्यावरही मोमतादिदींना बंगालचा गड सोडावा लागला.

मोमतादिदींना झालमुडी आवडत नाही. त्यांना पांता भात आवडतो. पांता भात म्हणजे आदल्या दिवशीचा शिळा भात रात्रभर भिजत ठेवून किंचित आंबूस झाल्यावर त्याला कांदा, मिरची वगैरे लावून ओरपण्याचा भात!! यालाही सरसों आणि लाल मिर्चीची फोडणी द्यावी. बरा लागतो. पण पांता भात हे बसून खाण्याचे प्रकरण आहे, तर झालमुडी उभ्याने!!

‘ए बाबू शुनो, झालमुडी हे भयमुक्ततेचे प्रतीक आछि, असे आम्हाला एक बंगालीबाबूमोशाय निर्भयपणाने सांगत होते. ते अगदी अलिकडेच म्हणजे काही तासांपूर्वी निर्भोय झाले! चिरमुऱ्याची फक्की मारत असताना आम्हाला तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही, आता चांगलाच कळू लागला आहे. झालमुडीतला मोहरीचा दणका दुसऱ्या दिवशी जाणवतो, असे म्हणतात ते काही उगीच नाही...

अंग बंग आणि कलिंग हे प्राचीन भारतवर्षाचे तीन आधारस्तंभ होते. अंग म्हणजे बिहार, कलिंग म्हणजे ओदिशा...हे दोन्ही प्रदेश जिंकल्यानंतर आता ‘बंग’ म्हणजे बंगालही पादाक्रांत केल्यानंतर मोदीजींनी ‘झालमुडी योजने’ची संकल्पपूर्ती केली आहे. एवढे सारे एका झालमुडीच्या पुडीने केले...

...एक पुडी झालमुडी की कीमत तुम क्या समझोगी, मोमतादिदी! दिदीऽऽ ओ दिदीऽऽ..! धोन्नोबाद!!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.