मासिक पाळी थांबत नव्हती म्हणून भोंदू बाबाकडे गेले… रात्रीच्या भयान अंधारात जंगलात नेऊन… धक्कादायक घटनेने पालघर हादरला
Tv9 Marathi May 05, 2026 06:45 PM

राज्यात दिवसेंदिवस भोंदूबाबा आणि त्यांचे प्रताप समोर येत आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण समोर येताच राज्यातील अनेक भोंदूबाबांचे खरे चेहरे नागरिकांनी आणि पोलिसांनी मिळून समोर आणले. आता पालघर जिल्ह्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गावठी औषध देण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन एका भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे डहाणू तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चरी पावण परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादीच्या बहिणीची मासिक पाळी थांबत नसल्याने गावठी औषध आणण्यासाठी आरोपी शिवराम परश सावर याच्याकडे पीडितेच्या कुटुंबाकडून संपर्क करण्यात आला होता. ३० एप्रिल रोजी संपर्क झाल्यानंतर ३ मे रोजी आरोपी स्वतः इको वाहन घेऊन पालघर तालुक्यातील खुताडपाडा येथे पोहोचला. फिर्यादी, पीडित अल्पवयीन मुलगी, नातेवाईक आणि साक्षीदार यांना वाहनात बसवून गावठी औषध देण्याच्या बहाण्याने डहाणू तालुक्यातील चरी पावण परिसरात येथे नेण्यात आले.

जंगल परिसरात नको ते केलं

रवीवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांना वाहनात थांबण्यास सांगितले.औषधं बनवण्यासाठी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यालगतच्या जंगल परिसरात नेले. तेथे मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

यानंतर पीडित मुलीला पुन्हा कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. मात्र संपूर्ण प्रकार पीडित मुलीने घरी गेल्यानंतर मध्यरात्री सर्व तिच्या सोबत घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली. यानंतर घरच्यांनी तात्काळ कासा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.घटनेनंतर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. कासा पोलिसांकडून पुढील तपास सुरू केला आहे. अंधश्रद्धा आणि गावठी औषधाच्या नावाखाली घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.