Snake Facts: सापाच्या डोक्यावर खरंच असतो नागमणी? जाणून घ्या त्या दाव्यातील सत्यता
Tv9 Marathi May 05, 2026 07:45 PM

Nagmani on Snakes Head: सापांचे जग हे कायम रहस्यमय राहिलेले आहे. पृथ्वीच्या पाठीवर सापाच्या हजारो प्रजाती आहे. पण आजही चर्चा नागलोकाचीच अधिक होते. लहानपणापासून सापाच्या डोक्यावर नागमणी असल्याची किंवदंती आपण ऐकत आलो आहोत. इच्छाधारी नागीण ही तर सर्वात आकर्षक कथा आहे. आपला भारतीय समाज नागदेवतेची पूजा करतो. पण साप दिसला की अगोदर काठी शोधतो. तर असे विपर्यास संस्कृतीत दिसून येतात. नागमणी खरंच असतो का की ही एक आपली कल्पना आहे?

काही लोकांसाठी नागमणी हा श्रद्धेचा विषय आहे. तर काही जण त्याला किंवदंती, काल्पनिक जग मानते. शास्त्रज्ञ, संशोधकांनी या परिकल्पनेचा शोध घेतला नाही असे नाही. इतिहासात काही वेड्यांनी नागमणी आणि इच्छाधारी नागीण या विषयावर बरीच वर्षे खर्ची घातली. पण त्यांच्याही हातात ठोस असे काही लागले नाही. पण अर्थातच हा थरारक विषय असल्याने त्याची उत्सुकता कमी झालेली नाही.

शास्त्रज्ञांचा नागमणीविषयी दावा काय?

आधुनिक विज्ञान नागमणीचे अस्तित्व नाकारते. कारण वैज्ञानिकांनी सापाच्या असंख्य प्रजाती शोधून काढल्या. सापावर असंख्य डॉक्युमेंट्री तयार झाल्यात. सापांचे आयुष्य, त्यांची झोप, त्यांची प्रणय क्रीडेपासून ते सापाच्या विषावर अनेक संशोधन झाले आहे. हे संशोधन रात्री आणि दिवसा करण्यात आलेले आहे. पण त्यावेळी नागमणी कुणालाच कधीच आढळला नाही. पण लोककथांमध्ये नागमणीचा पक्का दावा करण्यात येतो.

हिंदू पुराण आणि लोककथांमध्ये नागमणिची कथा

विज्ञान नाकारात असले तरी हिंदू पुराणात आणि लोककथेत नागमणी हा अद्भूत चमत्कार आहे. नागलोकाचाही भारतीय पुराणात उल्लेख आहे. इच्छाधारी नाग, नागीण हा एक रहस्यमय प्रकार आहे. नाग हे त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकतात असे वर्णन आहे. तर महाभारतातील नागांचा राजा तक्षक याचेही वर्णन येते. त्याच्याकडे मनुष्य रूप धारण करण्याची शक्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारतीय प्राचीन ग्रंथ वृहत्संहितामध्ये नागमणीचा उल्लेख आढळतो. अंधारात नागमणी प्रकाशमय होत असल्याचे वर्णन आढळते. नागमणीच्या शक्तीने निसर्गालाही नियंत्रित करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येतो. नागमणी असणाऱ्या व्यक्तीकडे असामान्य शक्ती येतात असे सांगितल्या जाते. वराहमिहिर हे प्राचीन खगोल शास्त्रज्ञ आणि ज्योतिष विद्येतील पंडित होते. त्यांच्या ग्रंथातही नागमणीचा उल्लेख आढळतो. इतर हिंदू धर्मातील शाखा आणि पंथ, उपपंथातही नागमणी, इच्छाधारी नाग, तक्षक आणि इतर नागलोकाचा इतिहास सांगण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : सदरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. यातील तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.