Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार
esakal May 06, 2026 12:45 PM
Narsapur Case : नसरापूर अत्याचारप्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

नसरापूर अत्याचारप्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू आहे. येत्या १५ दिवसांत जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष पथकाकडून फिर्यादी आणि आरोपींच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविण्याचे काम वेगात सुरू झाले आहे.

E-cigarette : ई-सिगारेटचा बाजार मुंबईत तेजीत

मुंबई : ई-सिगारेटवर देशात बंदी असली तरी त्याचा वापर आणि विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरुणांमधील याची वाढती सवय आरोग्यासाठी हे धोकादायक आहे. ‘लोकल सर्कल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात, ई-सिगारेटचा लोक नियमितपणे वापर करत असल्याचे सांगण्यात आले. हा पुरवठा सामाजिक माध्यमे, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे होत आहे. बंदी असूनही उत्पादन उपलब्ध झाल्याने नियंत्रण यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Mumbai News : 'एसआरपीएफ' भरती प्रक्रिया स्थगित

मुंबई : राज्य राखीव पोलिस बलाच्या (दौंड) येथील शिपाईपदाच्या भरतीसाठी गेल्या आठवड्यात झालेली लेखी परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेसाठी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी सुमारे ८५ प्रश्न महाराष्ट्र पब्लिकेशन पोलिस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंचातून निवडल्याचा आरोप करण्यात आला आहे, तशा तक्रारी प्राप्त झाल्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश महासंचालक कार्यालयाने जारी केले. ही चौकशी राज्य राखीव सुरक्षा बलाचे उपमहानिरीक्षकांमार्फत सुरू झाली असून ती पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय महासंचालक कार्यालयाने घेतला.

Konkan Railway : पनवेल-कळंबोली मार्गावर कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित

मुंबई : मध्य रेल्वेच्या पनवेल-कळंबोली अप मार्गावर मंगळवारी (ता. ५) रात्री मालगाडीच्या लोकोचा पॅन्टोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळित झाली. या घटनेचा फटका कोकण मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना बसला.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला न्यायालयाने पाच दिवसांची सुनावली पोलीस कोठडी

शिर्डी : येथील जमीन खरेदी फसवणूक व सावकारीप्रकरणी भोंदू अशोक खरात यास राहाता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याची पत्नी कल्पना फरार आहे. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज राहाता न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे. तर अटकेत असलेले दोन्ही आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांचे जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळले.

Weather Update : बंगळूरसह राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा

बंगळूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत पाऊस सुरू असून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बंगळूरसह राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खबरदारी म्हणून १३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. बंगळूर शहर व ग्रामीण भागासह दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हैसूर, मंड्या, हासन, कोडगू आणि चिकमंगळूर येथेही पावसाचा जोर राहणार आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. ६ ते ८ मेदरम्यान राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस मे १५ च्या सुमारास अंदमानात दाखल होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटकात पोहोचण्याची शक्यता आहे.

Kalaram Temple : काळाराम मंदिरात आज 'धर्मध्वज' सोहळा; माजी राष्ट्रपती कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

नाशिक, पंचवटी : आगामी सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिरात अयोध्येच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या २१ फूट उंच भव्य पंचधातूच्या ध्वजदंडाचा ध्वजारोहण सोहळा बुधवारी (ता. ६) होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येत आहेत.

CM Fadnavis : लैंगिक अत्याचारांच्या आरोपींना पॅरोल नको; कायद्यात बदलासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे न्याय विभागाला निर्देश

Latest Marathi Live Updates 06 May 2026 : वारंवार लैंगिक शोषणाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना पॅरोल मिळू नये, यासाठी कायद्यामध्ये बदल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत. नसरापूरमध्ये बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येही या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील निर्देश दिले आहेत. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.