Popular Singer Ishani Dave Retirement Rumours: आपल्या आवाजानं सर्वांना भूरळ घालणारा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) यानं नुकतीच प्ले बॅक सिंगिंगमधून (Playback Singing) निवृत्ती जाहीर केली. अरजितनं घेतलेल्या निर्णयानं चाहत्यांना पुरता धक्का बसला. प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असूनही गायकानं एकाएकी घेतलेल्या निर्णयानं चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. अरजितनं घेतलेल्या निर्णयाच्या धक्क्यातून सावरत नाहीत, तेवढ्यात आता एका सुप्रसिद्ध गायिकेनं संगीतविश्वाला अलविदा म्हटलं आहे. त्यासोबतच या गायिकेनं संगीतविश्वावर निशाणा साधला आहे. प्रसिद्ध गुजराती गायिका इशानी दवे (Gujarati Singer Ishani Dave) हिनं संगीतविश्वाला रामराम म्हटलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन इशानीनं आपला निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यासोबतच म्युझिक इंडस्ट्रीतल्या अनेक गोष्टींवर थेट भाष्य केलं आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये इशानी दवे हिनं म्हटलंय की, "एकेकाळी संगीत म्हणजे, श्वास घेण्याइतकं सोपं, प्रामाणिक आणि जिवंत होतं. प्रत्येक स्वर कुठल्यातरी खऱ्या भावनेतून निर्माण होत असे. रंगमंचावर गाण्याचं सादरीकरण करणं माझ्यावर कधीच दडपणाचं नव्हतं, तर ते माझं घर होतं. पण मग सारं काही बदलून गेलं. ज्या गोष्टीवर मी जिवापाड प्रेम केलं, तिचं रूपांतर हळूहळू एका बेडीत झालं. स्वप्नांची जागा डेडलाईन्सने घेतली, मनातील भावनांची जागा अपेक्षांनी घेतली आणि या सगळ्या प्रवासात कुठेतरी मी स्वतःलाच हरवून बसले..."
View this post on Instagram
"मी गाणं सुरूच ठेवलं, पण पूर्वीसारखं काही वाटत नव्हतं. माझा सूर आणि आवाज होता, पण त्यात आत्मा उरला नव्हता. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल? तर ज्या गोष्टीवर मी इतकं मनापासून प्रेम केलं, तिच गोष्ट आता मला जड वाटू लागली होती. मी संगीत हरवलंय असं मला वाटत नाही. कदाचित मी संगीताकडे जाणारी माझी वाट हरवून बसले आहे.", असं इशानी दवे हिनं म्हटलं आहे.
"कदाचित एखाद्या दिवशी मला माझी जुनी 'मी' पुन्हा सापडेल, अशी मुलगी जी कुणीतरी ऐकावं म्हणून नाही, तर स्वतःच्या आत खोलवर दडलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी गाईल. पुन्हा भेटुयात एका नव्या वळणावर!", अशी पोस्ट लिहून इशानीने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, गायिका इशानी दवेच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, तिला तिचा निर्णय मागे घेण्यासाठी विनवणीसुद्धा केली आहे. काहींनी तर तिला घाईघाईत निर्णय घेऊ नकोस, असं सुचवलं आहे. तर, काहींनी "तू तुझा वेळ घे आणि परत कमबॅक कर...", असं म्हणत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.