Environment Poetry: कवितेतून पर्यावरण संवर्धनाची नवी दृष्टी : डॉ. विठ्ठल वाघ यांचे प्रतिपादन, 'रानफुले' काव्यसंग्रहाचे प्रकाशन
esakal May 06, 2026 07:45 PM

पारनेर : "कविता वाचकांना डोळस बनवते. काव्यामधून आलेला शुद्ध सर्जनशील विचार मानवाला नवीन दृष्टी देतो. कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी जोपासली जाणे महत्वाचे असून वने, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी साहित्य निर्मिती व्हावी." असे विचार ज्येष्ठ साहित्यिक व लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून, कॉन्फरन्स हॉल, वनभवन, गोखलेनगर येथे साहित्यविश्व प्रकाशन आयोजित, सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील लिखित 'रानफुले' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

पुणे प्रादेशिक वनवृत्ताचे वनसंरक्षक आशिष ठाकरे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. से. नि. मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण पुणे वृत्त पंकज गर्ग, उपवनसंरक्षक (संशोधन) लक्ष्मण पाटील, कवी डॉ. शेषराव पाटील, श्रीमती प्रभाताई वाघ, श्रीमती वर्षा शेषराव पाटील, प्रकाशक विक्रम मालन आप्पासो. शिंदे, कवी, लेखक रामदास पुजारी, विभागीय वन अधिकारी अमोल थोरात, सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे व मंगेश ताटे यावेळी उपस्थित होते. शिरीष अस्थाना, सत्यजित गुजर, प्रकाश लोणकर, यशवंत पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, विठ्ठल धोकटे असे वनविभागाचे अनेक वरिष्ठ निवृत्त अधिकारी तसेच कार्यरत अधिकारी, कर्मचारी, व निसर्गप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले," आज जल, जंगल, जमीन वाचवण्याची अत्यंत गरज आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना मोकळा श्वास द्यायचा असेल तर निसर्गातील सर्व घटकांना जपले पाहिजे. वृक्षलागवड, वन्यजीव संरक्षण याचबरोबर सर्व सजीव, सूक्ष्मजीव, त्यांचा अधिवास, प्रत्येक परिसंस्था यांच्या संवर्धनासाठी, जैवविविधता रक्षणासाठी जन प्रबोधन महत्त्वाचे असून त्यासाठी कविता प्रभावी माध्यम ठरते. डॉ. शेषराव पाटील यांची पर्यावरणावरील कविता ही आधुनिक काळातील ' वनांचे श्लोक' असून निसर्गाचे महत्त्व दाखवून देते."

डॉ. शेषराव पाटील म्हणाले," वनविभागातील सेवेदरम्यानचे अनुभवांचे, निरीक्षणांचे, गरजांचे, उपायांचे, संवर्धनाचे ' रानफुले ' मध्ये संचित मांडले आहे. पर्यावरण, जैवविविधता व निसर्गातील विविध बाबींविषयी जनजागृती हा विचार घेऊन अनेक कविता लिहिल्या आहेत."

रंगनाथ नाईकडे म्हणाले, " झाडे, वने ही वसुंधरेची कवच कुंडले आहेत. मानव आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोडीतून पर्यावरणाचा नाश करत आहे. आजची वाढती तापमानवाढ व इतर पर्यावरणीय समस्या यांपासून आपली वसुंधरा वाचवायची असेल तर वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण हा एकमेव उपाय आहे. वसुंधरेच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायला हवे"

पंकज गर्ग यांनी, "अलीकडे समाजात लिखाण करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज लोकांमधील एकाग्रता कमी होत आहे. लोकांमधील अटेंशन स्पॅन कमी झाला आहे. प्रत्येकाने रोज आपल्या अनुभवांवर आधारित काहीतरी लिहिले पाहिजे. लिहिणे, वाचणे व लिखाणाचे दस्तऐवजीकरण या आपल्या मूलभूत सवयी झाल्या पाहिजेत."असे विचार व्यक्त करून, वनाधिकारी, वन कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर वने व पर्यावरणाविषयी साहित्य निर्मिती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. विठ्ठल वाघ यांनी या कार्यक्रमात शेती-माती वरील अनेक कवितांचे वाचन व गायन केले. कविता सरळ बोलत नाही, सुचकतेतून ती बोलत असते. सूचकता हा कवितेचा आत्मा आहे असे सांगून, कविता निर्मितीचा प्रवासही त्यांनी उलगडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवृत्त सहायक वनसंरक्षक कवी रामदास पुजारी यांनी केले. प्रकाशक विक्रम मालन आप्पासहेब शिंदे यांनी आभार मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.