Parbhani Crime News : परभणीच्या जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन कबुली दिली आहे.
चारित्र्यावर संशय घेत पतीने थेट पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा घडली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी पतीने पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. सुमित्रा श्रीधर गायकवाड असे 38 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती श्रीधर गायकवाड याने तिला घरातून दुचाकीवर बसवून जिंतूर-जालना महामार्गालगत असलेल्या गट क्रमांक 8 मधील शेतातील आखाड्यावर नेले. तिथे गेल्यानंतर त्याने प्रथम काठीने मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची जागीच हत्या केली.
दरमयान, घटना घडल्यानंतर पती श्रीधर याने स्वतः चारठाणा पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकाराची माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे,बीट जमादार उद्धव माने, उद्धव सातपुते तसेच गुप्तचर विभागाचे उमेश बारहाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून पुढील चौकशीनंतर खुनामागील नेमके कारण स्पष्ट होईल,अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान,या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
धाराशिवच्या तुळजापुरामध्ये गेल्या काही दिवसात हत्येच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. सहा महिन्यात तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक वेळा गोळीबार झाला आहे. त्यामुळं तुळजापूर शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कृष्णा रसाळ या 19 वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून हत्या घडली आहे या प्रकरणात आरोपीला अटकही करण्यात आली आहे. मात्र या घटनेने तुळजापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली सहा महिन्यातल्या प्रत्येक घटनेतील आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रत्येक घटनेवर कारवाई केली असून पोलीस सक्षम असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र तुळजापुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.