चाकण : चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात भाडेकरूची माहिती खोलीमालक, घरमालक वेळेवर पोलिसांना देत नाही .काही तर देतच नाही त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यास तो भाडेकरू कोणत्या खोलीत राहतो, तो कुठला आहे ,तो काय करतो याची माहिती खोली मालकालाही नसते आणि पोलिसांनाही मिळत नाही त्यामुळे गुन्हा केल्यानंतर कायदासुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे असे भयानक वास्तव आहे.
चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमागे भाडेकरूंची अपुरी नोंदणी हा एक महत्त्वाचा घटक ठरत आहे. अनेक ठिकाणी खोलीमालक, घरमालक भाडेकरूंची ओळखपत्रे, मूळ पत्ता,स्थायी पत्ता , नोकरीविषयीची माहिती पोलिसांकडे वेळेवर सादर करत नाहीत. काही खोली मालक भाडेकरूंचा विषय गांभीर्याने घेत नाहीत.अलीकडेच घडलेल्या काही गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी हे भाड्याने राहणारे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान त्यांची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याने पोलिसांना शोधकार्य गुन्ह्याचा तपास करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा निष्काळजीपणामुळे गुन्हेगारांना वाव मिळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
पोलिस प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. महाळुंगे पोलिसांनी सात खोलीमालकावर गुन्हे दाखल केले आहेत. सर्व खोलीमालकांना भाडेकरूंची संपूर्ण माहिती नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत व परिसरातील गावात सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रशासन, नागरिकांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चाकण व औद्योगिक वसाहत परिसरातील गावात सुमारे तीन लाखावर भाड्याच्या खोल्या आहेत. काहींच्या नोंदी ग्रामपंचायतीकडे आहेत तर काहींच्या नोंदीच केलेल्या नाही त्यामुळे कोण कोणत्या भाड्याच्या खोलीत राहतो हे समजत नाही. खोली मालक संबंधित ग्रामपंचायतीला, पोलीस ठाण्याला खोल्यांची माहिती देत नाही .खोलीत कोण राहतो याची सविस्तर माहिती देत नाही त्यामुळे परराज्यातील, राज्यातील अनेक गुन्हेगार अनेक भाडेकरू येथे बेकायदा पद्धतीने राहतात. गुन्हे करतात खून करतात आणि त्यानंतर पसार होतात. त्यामुळे पोलिसांना त्यांचा शोध घेताना अनेक अडचणी निर्माण होतात.
महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितले की," खालुंब्रे येथे तीन वर्षाच्या मुलाचा लैंगिक अत्याचार करून खून करून बिहार राज्यात पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने पकडले. त्या आरोपी बाबत खोली मालकाला काहीच माहिती नव्हती तो आरोपी आपल्या खोलीत राहत आहे याची माहिती नव्हती. त्यामुळे त्याच्याकडे त्या आरोपीचा पत्ता, तो कोठे काम करतो याची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे पोलिसांना तपासात अनेक अडथळे आले. संबंधित खोली मालकावर गुन्हा दाखल केलेला आहे. भाडेकरूंना खोली देताना त्याची सविस्तर माहिती घ्यावी. त्याचा करारनामा करावा व तो पोलीस ठाण्याला द्यावा असे आवाहन व जनजागृती करण्यात येत आहे."
चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात भाड्याच्या खोल्या -३ लाख
भाडे सुविधानुसार -२ ते पाच हजार रु.
ग्रामपंचायतीकडे ,नगरपरिषदेकडे भाड्याच्या खोल्यांची नोंदणी संख्या मात्र अत्यल्प
पोलीस ठाण्यात मोजकेच खोली मालक भाडेकरूचे करार देतात
एका भाड्याच्या खोलीत अगदी पाच ते सहा परप्रांतीय तरुण राहतात