Khutbav News : भांडगावच्या कंजारभट समाजातील ४० कुटुंबांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच मिळाले जात प्रमाणपत्र
esakal May 06, 2026 08:45 PM

- प्रकाश शेलार

खुटबाव (पुणे) - भांडगाव (ता. दौंड) येथील कंजारभट समाजातील ४० कुटुंबाची अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच या कुटुंबांना आमदार राहुल कुल व कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र मिळाले आहे. भांडगाव येथे कर्तव्य फाउंडेशन च्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना आमदार फल यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने गावातील ४० कुटुंबांना मोफत पीएम सूर्यघर योजनेचा लाभ देण्यात आला. यापूर्वी मे २०२५ मध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यामध्ये ७७ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. वेस्टर्न मेटल प्रायव्हेट कंपनीने यासाठी सीएसआर फंड दिला . कार्यक्रमांमध्ये गावातील आठ महिला बचत गटांना प्रोत्साहन निधी म्हणून प्रत्येकी ११००० रुपये देणगी देण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयाला कायमस्वरूपी उजेडाची सोय व्हावी म्हणून भांडगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीवरील सौर ऊर्जा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे, पंचायत समिती सदस्य रेखा चौधरी, तेजस्विनी पडळकर, फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम कापरे, विजय दोरगे, प्रमोद दोरगे, रवी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

श्याम कापरे ( अध्यक्ष, कर्तव्य फाउंडेशन) -

गेली पाच वर्षापासून फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा या विषयावर काम करत आहे. आज तागायत गावातील ११७ कुटुंबांना मोफत पीएम सुर्यघर योजनेचा लाभ मिळाला आहे. भविष्यात जिल्ह्यातील पहिले सौर ग्राम म्हणून भांडगाव ची ओळख तयार करायची आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.