Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. हरभरा खरेदीत आणखी 58 हजार 632 मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य सरकारच्या मागणीनुसार तूर खरेदीची मुदत 31 मे 2026 पर्यंत तर हरभरा खरेदीची मुदत 29 मे 2026 पर्यंत वाढवून दिली आहे. तूर खरेदीसाठी 90 दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी 60 दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर आणि हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी सातत्याने होत होती. य़ा मागणीचा विचार करुन सरकारनं मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढ मिळवून दिल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.